[Mumbai Tak]"अजित पवार अमित शाहांना चोरून भेटायला का येत होते?"
सुप्रिया सुळेंनी पकडले कात्रीत
upriya Sule on Ajit Pawar : 'वेशांतर करून अमित शाहांना दिल्लीला भेटायला जायचो', या अजित पवारांच्या विधानाने विरोधकांना कोंडीत पकडण्याची आयती दिली आहे. खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर हल्ला चढवला आहे. अजित पवार नाव बदलून करणे, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याचे सांगत भाजपला काही सवाल सुप्रिया सुळेंनी केले आहेत.
दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी वेशांतर करून अमित शाहांच्या भेटी घेतल्याचा मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "वर्तमानपत्रात मी अशी बातमी वाचली की, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते (अजित पवार) हे नाव बदलून आणि वेशांतर करून दिल्लीला यायचे, असा त्यांनी (अजित पवार) स्वतः खुलासा केला आहे. मला तीन-चार प्रश्न नम्रपणे विचारायचे आहेत. एक म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेता होतात. विरोधी पक्षनेते असताना तुम्ही अमित शाहांना का भेटत होता? ते पण तुम्हीच कबूल करता की, तुम्ही चोरून भेटत होता. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेते असताना महाराष्ट्राशी तडजोडी करत होतात."
अजित पवार तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली -सुप्रिया सुळे
"एकीकडे तुम्ही भाजपचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे तुम्ही अमित शाहांशी दारामागे चर्चा करत होता. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षनेते पदाशी आणि महाराष्ट्राशी बेईमानी केली असा त्याचा अर्थ होतो", असा हल्ला सुप्रिया सुळे यांनी केला.
"खरं खोटं माहिती नाही, पण चॅनेलमध्ये असं बघितलं की, ते सातत्याने नाव बदलून येत होते. हा या देशात राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. आपल्यासारखे लोक जर मुंबईला जायला निघाले, तर त्याला आधार कार्ड लागतं. त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का तर नाही. पण, राज्याचे विरोधी पक्षनेते नाव बदलून बुकिंग करतात. विमानतळावर जेव्हा जातो, तेव्हा आधार कार्ड त्या नावाला जुळत का? आज अजित पवारांनी असं केलं, उद्या दहशतवादी असं करेल. तो नाव बदलून येईल", असे टीकास्त्र सुप्रिया सुळेंनी डागलं.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "उद्या दहशतवादी येतील"
याच मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. मुंबई आणि दिल्ली विमानतळाची चौकशी झाली पाहिजे. विमान कंपनीची चौकशी झाली पाहिजे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याचे उत्तर दिले. अजित पवार अमित शाहांना भेटायला येत होते. उद्या दशतवादी येतील. याची जबाबादारी कोण घेणार?"
"माझा प्रश्न आहे की, अजित पवार अमित शाहांना चोरून भेटायला का येत होते? असे काय शिजत होते? दहा वेळा भेटले. गंमत अशी आहे की, २ जुलै रोजी अजित पवारांनी शपथ घेतली. त्याच्या पाच दिवस आधी मध्य प्रदेशात पंतप्रधानांनी बँकेच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर केला", असे म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपलाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
"पाच दिवस आधी पंतप्रधान आणि त्यांचे मंत्री अजित पवारांवर आरोप करत होते. दुसरीकडे त्याच्या आधी दहा वेळा अमित शाहांना अजित पवार भेटत होते. एकीकडे पंतप्रधान भ्रष्टाचाराचे आरोप करत होते आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह चर्चा करत होते. म्हणून लोक म्हणतात की, भाजप ही भ्रष्ट जुमला पार्टी आहे", असे टीकास्त्र सुप्रिया सुळे यांनी भाजपवर डागले.
