2 minutes reading time (418 words)

[loksatta]“इतना तो हक बनता है”,

“इतना तो हक बनता है”,

सुप्रिया सुळेंची मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर मिश्किल प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत दर्शन घेऊन नंतर निळवंडे धरणाचं लोकार्पणही केलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. "राज्यातील मोठे नेते केंद्रात कृषीमंत्री होते, पण त्यांनी शेतीसाठी काय केलं?" असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला. यावरून आता शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. यासंदर्भात गुरुवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदींच्या पूर्वीच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आज खासदार सुप्रिया सुळेंनी मोदींच्या टीकेवर मिश्किल टिप्पणी केली आहे.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

"महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते (शरद पवार) केंद्र सरकारमध्ये अनेक वर्षे कृषीमंत्री होते. व्यक्तिगत पातळीवर मी त्यांचा सन्मान करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात देशातील शेतकऱ्यांकडून केवळ साडेतीन लाख कोटींचा शेतीमाल एमएसपीवर खरेदी केला. पण आमच्या सरकारने सात वर्षांत साडे तेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले", अशी टीका मोदींनी गुरुवारी आपल्या भाषणातून केली.

जयंत पाटलांनी शेअर केला 'तो' व्हिडीओ!

दरम्यान, जयंत पाटील यांनी मोदींच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. "किती हा विरोधाभास? शरद पवार यांनी ६० वर्षांत शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही असं म्हणणाऱ्या पंतप्रधानांनीच पूर्वीच्या भाषणात शरद पवारांच्या कार्याबद्दल वस्तुस्थिती मांडली होती", असं जयंत पाटील एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये म्हणाले आहेत. या व्हिडीओमध्ये "शरद पवारांच्या डोक्यात गाव, शेतकरी, शेतीतील आधुनिकता यावर कायम विचार राहतात. शरद पवारांची शेतीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची पद्धत आहे", असं मोदी सांगताना दिसत आहेत.

सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी!

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना सुप्रिया सुळेंनी मोदींच्या भाषणावर मिश्किल टिप्पणी केली आहे. "जयंत पाटलांच्या पोस्टमध्येच बरीच उत्तरं आहेत. एकतर मोदींनी शरद पवारांना पद्मविभूषण हे त्यांच्याच सरकारमध्ये शेतीविषयक कामांसाठी दिलं आहे. मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर ते शरद पवारांचं नाव नेहमीच घेतात. कधी प्रेमानं, कधी टीका करताना. राजकारणात एवढं तर चालतंच, इतना तो हक बनता है", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

"महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलताना मोदी नेहमीच नॅचरल करप्ट पार्टी म्हणायचे. यावेळी मोदींनी कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावर केला नाही", असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला. अजित पवार गट राज्य सरकारमध्ये सहभागी होण्याच्या काही दिवस आधीच मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उल्लेख 'नॅचरल करप्ट पार्टी' असा करत सिंचन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात आता विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

[loksatta]“धनगर, मराठा, लिंगायत आणि मुस्लीम आरक्षण...
[tv9marathi]शरद पवार यांच्यावर नरेंद्र मोदी यांची ...