2 minutes reading time (423 words)

[sarkarnama]पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

पवारांच्या कृतज्ञता सोहळ्यात सुळेंनी विलासरावांबरोबरच पद्मसिंह पाटलांचीही आठवण काढली

मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता 

 Latur News : किल्लारी आणि परिसरात १९९३ मध्ये झालेल्या भूकंपाला आज (ता. ३० सप्टेंबर) तीस वर्षे पूर्ण झाली. भूकंपानंतर तातडीने पुनर्वसन केल्याबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत किल्लारीत आज कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सोहळ्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबरोबर तत्कालीन मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कामाचीही आठवण सांगितली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या आयुष्यात तीन-चार घटना महत्त्वाच्या आहेत. त्यातील मुंबई बॉम्बस्फोट आणि किल्लारीचा भूकंप या दोन घटनांबद्दल माझ्या आणि माझ्या आईच्या मनात कायम अस्वस्थता असते. सलग दोन आठवडे ते किल्लारी परिसरात राहिले होते. त्यावेळी दोन आठवडे सतत भूकंपाच्या बातम्या येत होत्या. त्यावेळी मोबाईल व इतर संपर्काची कोणतीही साधने नव्हती. त्यामुळे कोण कोठे आहे, हे काहीच कळत नव्हते.

विलासराव देशमुख आज व्यासपीठावर नाहीत, याचं आज मला कायम दुःख वाटतं. कारण आमचे कौटुंबिक संबंध तर आहेतच, पण त्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावून जे काम केले, ते उभा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. ते पुढे अनेक वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याला विचारा की, काँग्रेसच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांचे चांगले सहकार्य मिळाले, तर ते सर्वजण विलासराव देशमुख यांचं नाव घेतील. कारण आघाडीत मुख्यमंत्री असणं सोपं नसतं. पण, विलासराव देशमुख यांनी कधीही राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर दिलं नाही. नेहमी एका कुटुंबाप्रमाणे सर्वांना वागवलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळं, असं कधीच केलं नाही. सगळ्यांना प्रेम आणि मानसन्मान दिला, असे सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माजी मुख्यमंत्री (स्व) विलासराव देशमुख यांची आज आठवण येते. तसेच, पद्मसिंह पाटील यांनाही आजच्या कृतज्ञता सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते. त्यांना आज कार्यक्रमाला येता आले नाही, त्यांनीही केलेल्या कामाची नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे. या सर्वांनी महाराष्ट्राच्या उभारणीत जे काम केले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.

भूकंपग्रस्त आरक्षणाच्या संदर्भातील काही प्रश्न असतील तर त्याबाबत सरकारशी आम्ही ताकदीने लढू. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेश टोपे, मी मिळून राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे, त्यामुळे त्यांची ताकद काय असू शकते असे दिसून येते, असे सुळे यांनी नमूद केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कांदा, तूर, सोयाबीन अशा पिकांना हमीभाव या सरकारकडून मिळत नाही. अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आम्ही सरकारशी भांडू. कांद्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा मी प्रश्न उचलला होता. दिल्ली सरकारकडे जे प्रश्न असतील, त्यावर मी आणि ओमराजे निंबाळकर मिळून सरकारशी भांडून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.

[loksatta]“देशातील लहान लेकरालाही…”
[PRIME FOCUS MARATHI]केंद्राने चेक असा दिलाय त्याच...