[loksatta]वडील म्हणून शरद पवार कसे आहेत? सुप्रिया सुळे म्हणाल्या,
"खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेत जाताना…"
खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात आलेल्या सुप्रिया या जेव्हा पहिल्यांदा लोकसभेत खासदार म्हणून गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शरद पवारांनी एक सल्ला दिला होता. 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात याबाबत सुप्रियांनी सांगितलं. तसेच शरद पवार वडील म्हणून कसे आहेत, याबद्दलही त्या बोलल्या.
"एक वडील म्हणून शरद पवार कसे आहेत?" असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, "एकतर ते फार मार्गदर्शन करत नाहीत, खूप कमी बोलतात. जेव्हा मी पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले तेव्हा लोकसभेत जाण्यासाठी घरून निघताना ते जे म्हणाले होते ती गोष्ट मला अजुनही आठवते." यावेळी सुप्रिया यांनी पहिल्यांदा लोकसभेत जाताना वडिलांनी कोणता सल्ला दिला होता, ते सांगितलं.
सुप्रिया म्हणाल्या, "ते मला म्हणाले आज तू पहिल्यांदा गेट नंबर १ ने लोकसभेची खासदार म्हणून चालली आहेस. आयुष्यभर एक लक्षात ठेव, गेट नंबर एकच्या या ज्या पायऱ्या आहेत ना त्या चढण्यासाठी तुला संधी मिळाली ती फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांमुळे मिळाली. जोपर्यंत तू दरवेळी या पायऱ्या चढताना मतदारांना लक्षात ठेवशील तोपर्यंत या पायऱ्या तुला चढता येतील. ज्यादिवशी तू मतदारांना विसरशील त्यादिवशी तुला या पायऱ्या चढता येणार नाही", अशी पहिल्यांदा लोकसभेत जाताना वडिलांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण सुप्रिया सुळेंनी सांगितली.
दरम्यान, या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा विविध श्रेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. या शोच्या आगामी भागात सुप्रिया सुळे दिसणार आहेत.
