2 minutes reading time (357 words)

[sakal]‘एनडीए’च्या निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

‘एनडीए’च्या निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट

खडकवासला : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए)च्या परिसरातील घरांच्या दुरुस्ती संदर्भातील १०० मीटर अंतराच्या अटीबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी १०० मीटरच्या अंतरावरील बांधकामे व दुरुस्तीला परवानगी द्यावी. अशी विनंती यावेळी करण्यात आली.

प्रबोधिनीसाठी कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे, उत्तमनगर, अहिरे, कुडजे यांची जागा १९४८ मध्ये घेतली. प्रबोधिनीची स्थापना १९५४ मध्ये झाली. त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने २०१७ मध्ये एनडीएच्या आवारात प्रशिक्षणार्थीसाठी विमानतळ बांधण्याचे ठरविले.

परिणामी प्रबोधिनीलगत असलेल्या कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे, उत्तमनगर, कुडजे, किरकटवाडी आणि खडकवासला येथील नागरीकांना घरांची दुरुस्ती किंवा बांधकामांसाठी संरक्षण विभागा(एअर फोर्स)कडून, 'ना हरकत प्रमाणपत्र' घेण्याचे निर्बंध आले.

परंतु प्रबोधिनी'च्या संरक्षण भिंतीपासून १०० मीटर आवारात असलेल्या बांधकामांच्या फाईली 'प्रबोधिनी'ने २०१९ सालापासून पुढील मंजुरी पाठविल्याच नाहीत. परंतु २५ ऑक्टोबर २०१६ च्या परिपत्रकानुसार प्रबोधिनी'च्या संरक्षण भिंतीच्या अंतराची अट १० मीटर परिसरातील बांधकामांना लागू होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने देखील २०१६ चे परिपत्रक मान्य करून १० मीटरची अट वैध असल्याचा निर्वाळा दिला आहे. परंतु तरीही 'प्रबोधिनी' १०० मीटरच्या अटीवर अडून बसलेली आहे.

कोंढवे- धावडे, शिवणे, कोपरे, उत्तमनगर, कुडजे, किरकटवाडी आणि खडकवासला गावातील नागरीकांच्या जमिनी प्रबोधिनी स्थापन करताना घेतल्या आहेत. ही विशेष नमूद करण्याची बाब आहे. येथील ग्रामस्थांचा त्याग मोठा आहे.

तो लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविलेले २०१६ चे परिपत्रक मान्य करावे. आणि त्यानुसार, १०० मीटरच्या अंतरावरील बांधकामे व दुरुस्तीला तातडीने परवानगी द्यावी. अशी विनंती संरक्षणमंत्र्यांना खासदार सुळे यांनी निवेदनाद्वारे केली.

तसेच, अहिरे गाव, मोकारवाडी सोनारवाडी, वांजळेवाडी आणि खाडेवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होते.

हे रस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या अखत्यारीत येतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी विविध पातळ्यांवर निधी उपलब्ध आहे.

केवळ काही विशेष परवानग्या नसल्यामुळे हे काम करता येत नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी देखील सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी ग्रामस्थ त्रिंबक मोकाशी, विजय गायकवाड, शैलेश चव्हाण आणि खुशाल करंजावणे आदी उपस्थित होते. 

...

Supriya Sule : ‘एनडीए’च्या निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्र्यांची भेट |nda near home maintenance supriya sule meets rajnath singh allow them permission to develop homes

१०० मीटर अंतरावरील घरांची बांधकामे, दुरुस्तीला परवानगी देण्याची राजनाथ सिंह यांच्याकडे खासदार सुप्रिया सुळेंची मागणी
[Zee 24 Taas]शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार...
[politicalmaharashtra]पुण्यात मोठा राडा..! भाजपच्य...