[Lokmat]प्रदूषणाच्या विळख्यातून सिंहगड रोडच्या प्रयेजा सिटीची सुटका होणार
सुप्रिया सुळेंकडून दखल
सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव खुर्दजवळील प्रयेजा सिटी व देवीआईनगर परिसरातील हजारो नागरिक रेडिमिक्स सिमेंटद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहेत. परिसरातील एक ते दीड किलोमीटर रस्त्यावर सिमेंट सांडून धुळीचे लोट पसरले आहेत. संबंधित गाड्यांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
वडगाव खुर्द यथील देवीआईनगर परिसरात रेडिमिक्स सिमेंटच्या काही लहान मोठ्या कंपन्या व प्लांट आहेत. येथून दररोज सिमेंट, खडी, रेडिमिक्स ट्रकची वाहतूक होत असते. शंभरहून अधिक रेडिमिक्स ट्रकमुळे परिसरात सिमेंटचे धुळीचे लोट पसरतात. रेडमिस ट्रकमधून रस्त्यावर पडणारे रेडिमिक्स व वाहतूक करणाऱ्या सिमेंट टेंपोमुळे सिमेंटचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या प्रकरणाची दखल घेत सुप्रिया सुळे यांनी प्रयेजा सिटीतील नागरिकांची भेट घेत, या संपुर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करण्याची हमी दिली आहे. प्रदूषणावर नागरिकांशी सविस्तर चर्चा झाली होती. हे सिमेंट प्लान्ट बंद व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर मी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलीये. ते याबद्दल ८ दिवसात मला उत्तर देणार आहेत. असं सुळे यांनी यावेळी सांगितले आहे.
प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी आणि प्लांटचालक यांचे संगनमत करून कोणतीही अडचण नसल्याचे भासवत असल्याचा आरोप सोसायटीतील रहिवाशांनी केलाय. प्रयेजा सीटीतील रहिवाशांना तेथील बेकायदेशीर रेडीमिक्स यांच्या प्रदूषणाचा त्रास होत असल्याचे वारंवार लेखी तक्रार देऊन हि कुठल्याही पद्धतीची ठोस कारवाई न होत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय. प्रयेजा सिटीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर टॅंकर किंवा ट्रक यावर निर्बंध आहेत. तरीही संबंधित टॅंकर मालक ते झुगारून देतात. अशा बेपर्वाईमुळे काही दिवसांपूर्वी एका निष्पाप महिलेचा जागीच बळी गेला होता. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी दखल घेतल्यानंतर प्रयेजा सिटीतील रहिवाश्यांचा प्रश्न आता तरी सुटतो का आणि रेडीमिक्स सिमेंट प्लांटवर करवाई होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.