2 minutes reading time (335 words)

[loksatta]पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं

पुण्यात चालकाने बस रिव्हर्स चालवत अनेक वाहनांना उडवलं

सुप्रिया सुळेंची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पुण्यात एका बस चालकाने रिव्हर्स बस चालवत १० ते १५ वाहनांना धडक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला आहे. घटनेच्या वेळी बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. आरोपीनं बेभानपणे बस चालवल्याने सर्व प्रवाशांमध्ये भीती पसरली होती. बसचे दोन्ही दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना बाहेरही पडता येत नव्हतं. त्यामुळे बसमधील प्रवाशी "आम्हाला वाचावा, बस थांबवा" अशी हाक देत होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही सुप्रिया सुळेंनी केली.

'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, "संतोष माने प्रकरणाची आठवण यावी असा थरार पुन्हा एकदा पुण्यात घडला. सेनापती बापट रोड परिसरात पीएमपीएमएलच्या बसचालकाने मद्यधुंद अवस्थेत दहा ते पंधरा गाड्यांना उडवल्याचा प्रकार घडला. या बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे."


नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रोडवरील एका सिग्नलवर एमएच १४ एचयू ५७२५ क्रमांकाची पीएमपीएल बस चिंचवड गावाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. त्यावेळी बसचालक नीलेश सावंत याने एका चारचाकी वाहनाला कट मारला. त्या चारचाकी वाहन चालकाने आरोपी नीलेश सावंत याला जाब विचारला. यानंतर राग अनावर झालेल्या नीलेश सावंत याने बस रिव्हर्स घेऊन काही वाहनांना धडक दिली. त्यानंतर पुढील बाजुला असलेल्या काही वाहनांना धडक देत काही अंतर बस बेभान घेऊन गेला.या प्रकारानंतर नागरिकांनी बस आडवली आणि आरोपी नीलेश सावंत याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीदेखील बस चालविताना शालेय विद्यार्थ्यांसोबत डेक्कन परिसरात आरोपीचा वाद झाला होता. त्यावेळी आरोपीने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती.

[maharashtradesha]राज्यातील ट्रिपल इंजिनचं खोके सर...
[loksatta]“केंद्राने आणि राज्याने सर्वपक्षीय बैठक ...