[Sarkarnama]राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले
आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरवावा का? नंतर यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा व्हावा, याबाबत वक्तव्य केले आहे.
पुणे दौऱ्यावरती असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेमधील पक्षाचे कार्यालय हे लोकसभा सचिवालयाने राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाला दिला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे. पक्ष कोणी एकाच नसतो पक्ष म्हणजे एक विचार असतो आणि त्या पक्षाची स्थापना शरद पवार यांनी केली आहे. (Supriya Sule News) .
हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पुरता नसून शिवसेनेचा देखील आहे. शिवसेनेची स्थापना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि त्यांच्या हयातीमध्येच त्यांनी या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा आणि शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच राहणार असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्यासोबतच लोकसभा सचिवालयाकडून कार्यालय आमच्या पक्षाला दिलं हे वास्तव आहे. उशिरा का होईना अदृश्य शक्तीला खरा पक्ष कुठला हे समजले याचा आनंद आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.बारामती शहर परिसरात सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री आणि योगेंद्र पवार यांचे फिक्स आमदार म्हणून पोस्टर लागले आहेत. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, बॅनर लावल्याने कोणी मुख्यमंत्री होत नसतं मायबाप जनता ठरवते. सशक्त लोकशाहीमध्ये जनतेच्या हातात सर्व ताकद असून या पोस्टर बाजूला आपण महत्त्व देत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तर तुम्ही ही संधी स्वीकारणार का असा प्रश्न विचारला असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुठलही पद हे महिला आणि पुरुष असे नसते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ही अशी व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल जी महाराष्ट्राची आन-बान, शान राखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्याचे कर्तृत्व तिच्यामध्ये असेल मग ती महिला, पुरुष त्याच्यामध्ये कोणताही फरक मला जाणवत नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. येत्या काळात जर संधी मिळाली तर राज्याचा मुख्यमंत्री होणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना मी जर तरच्या प्रश्नाला उत्तर देत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी याबाबत अधिकच बोलणे टाळले.
