[Lokmat News18]'रविंद्र धंगेकरांचा विजय हा दडपशाही प्रथेविरोधातला एल्गार'
सुप्रिया सुळे यांची मोठी प्रतिक्रिया
पुणे, 02 मार्च : कसब्यातील विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या की, हा विजय म्हणजे छत्रपतींचे संस्कार झालेल्या मराठी माणसाने दडपशाहीच्या आणि पैसे वाटण्याच्या प्रथेविरोधातला एल्गार आहे. भाजपचे वरिष्ठ लोक साम, दाम, दंड, भेद काहीही करा पण निवडणूक जिंका याविरोधतील हा कल असल्याचे त्यांनी म्हटले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचा आज (दि.02) इंदापूरमध्ये गाव भेट दौरा आहे. यादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मतांच्या विभाजनामुळेचं चिंचवड मध्ये भाजपची आघाडी
पिंपरी चिंचवडमध्ये जर मताचे विभाजन झाले तरच भारतीय जनता पार्टी निवडून येते. चिंचवड मधील भाजपची आघाडी ही त्यामुळेचं आहे. सर्वसामान्य जनता ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करते. हे पक्षाच्या विरोधात नसून त्यांनी राबवलेली धोरणे, महागाई याच्या विरोधातील जनतेचा हा कल आहे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा हुकूमशाहीच्या विरोधातील विजय
देश हा संविधानाप्रमाणे चालला पाहिजे तो हुकूमशाहीने चालता कामा नये. पारदर्शक कारभार आणि संविधानाच्या चौकटीतून निवडणुका झाल्या पाहिजेत यासाठी हुकूमशाहीच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याची प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलीय.सरकारकडून केंद्रीय निवडणूक आयुक्त नेमणुकीची प्रक्रिया चुकीची ठरवली गेली असा सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे.