[Sakal]हिंजवडी अपघात मालिका: माण फेज-३ परिसरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका
खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रशासनाला आवाहन
हिंजवडी आयटी पार्कमधील माण फेज-३ परिसरातील मेगापॉलिस सॅफरॉन चौकातील रस्ते जीवघेणे झाले आहेत. या भागात चिखल-मातीचा राडा पसरला आहे. त्यामुळे दिवसभरात अनेक दुचाकीस्वारa घसरून छोटे-मोठे अपघात होत आहेत. .
हिंजवडी हे प्रमुख आयटी हब म्हणून ओळखली जाते. लाखो आयटी कर्मचारी व रहिवासी दररोज इथे ये-जा करतात. परंतु; येथील प्रशासकीय संस्थांना कसलेही गांभीर्य नसल्याने रस्ता दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. काही स्थानिक ग्रामस्थ व आयटी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात तेलसदृश्य द्रव काही वाहनांतून सांडले आहे.
.त्यामुळे दुचाकी घसरून पडत आहेत. सोमवारी (ता. ८) सकाळपासून संध्याकाळपर्यंत किमान १२ दुचाकी घसरून अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. यापैकी दोन अपघात गंभीर स्वरूपाचे असून जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळाली..
परिसरातील नागरिक आणि सोसायटी रहिवाशांनी पीएमआरडीए आणि एमआयडीसीकडे याबाबत अनेकदा तक्रारी नोंदविल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या भागातून प्रवास करणे आता जीव धोक्यात घालण्यासारखे झाले असून विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हे घातक आहे. त्यामुळे, माण रस्ता स्वच्छ धुतला तरी अपघातांची मालिका तात्पुरती टळेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत रस्त्याची दुरवस्था आणि अपघातांच्या फोटोंसह येथील गंभीर परिस्थिती मांडून प्रशासनाला रस्त्याच्या दुरुस्तीचे आवाहन केले आहे. तसेच तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. ''या रस्त्यांवरून प्रवास करणे जीवघेणे झाले आहे. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता माझी शासनाला विनंती आहे की, कृपया सदर रस्ता तातडीने दुरुस्त करण्याच्या संदर्भाने कार्यवाही करण्यात यावी,'' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
रस्ता निसरडा झाल्याचा प्रकार समजल्यानंतर आम्हालाही शंका होती की, तेथे काहीतरी ऑइल वगैरे गळती झाली असावी. त्यामुळे आम्ही अग्निशमन दलाच्या बंबामार्फत तो रस्ता साफ करून घेतला आहे. तरीही आणखी तो प्रकार थांबला नसेल, तर पुन्हा पाहणी करून उपाययोजना केल्या जातील.
राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता
