[Lokmat]बनेश्वरकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्त झाला नाही तर ४ मार्चपासून आमरण उपोषण; सुप्रिया सुळेंचा इशारा
"नसरापूर ( पुणे ) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील बनेश्वर या तीर्थक्षेत्राकडे पुणे बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळून झाली असून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. याकरीता महाशिवरात्रीच्या आधी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाला अद्याप जाग आली नाही. त्यामुळे तात्काळ या रस्त्याची वर्क ऑर्डर काढून दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही, तर येत्या चार मार्चपासून आपण आमरण उपोषणाला बसू असा गंभीर इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी बनेश्वर येथे दिला आहे.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज पहाटेच बनेश्वर देवस्थान येथे दर्शन घेण्यासाठी खासदार सुळे या आल्या होत्या. त्यावेळी महिलांसह अनेक नागरिकांनी अनेक वेळा सुप्रिया सुळे यांच्याकडे रस्त्याच्या झालेल्या चाळणी बाबत लक्ष वेधले होते. त्यावेळी त्यांनी या रस्त्या करता अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला असून कुठल्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांनी बनेश्वरचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनाला थेट उपोषणाचा इशारा दिला आहे. वारंवार लक्षात आणून देऊनही प्रत्यक्ष आज महाशिवरात्री आली तरी तरीही शासनाचे याकडे लक्ष जात नाही. अद्याप वर्क ऑर्डर सुध्दा काढली गेली नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून हा रस्ता तातडीने दुरुस्त केला नाही किंवा किमान वर्कऑर्डर काढली गेली नाही तर येत्या ४ मार्च पासून आपण स्वतः नाईलाजाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत, याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे सुळे यांनी म्हटले आहे. अलीकडेच याबाबत त्यांनी आणखी एक पत्र दिले होते.
महाशिवरात्रीच्या दिवशी बनेश्वर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी या रस्त्याचे क्रॉंक्रीटीकरण करावे म्हणून ग्रामस्थांसह आपण स्वतः वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्यासाठी पत्रे पाठवली आहेत. अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन सूचना देण्याबरोबरच निवेदने आणि ग्रामस्थांच्या सह्यांची पत्रेही वारंवार आपण दिली आहेत असे सुळे म्हणाल्या.
