[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे
खासदार सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र
नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे. हा राज्य मार्ग रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करून रस्त्याचे काम झाल्यास येथील दळणवळण वाढून भोर वेल्हा तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना खासदार सुळे यांनी लेखी पत्र पाठवले असून लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी विनंती केली आहे. महाड - रानवडी - कर्णवडी - मढेघाट - केळद - पासली - भट्टी - वेल्हे - आंबवणे - नसरापूर - चेलाडी फाटा राज्य मार्ग १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ - पुणे बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मार्ग असून पुण्याहून कोकणला जाणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. हा राष्ट्रीय महामार्ग असा घोषित करून त्याचे काम पूर्णत्वास जाणे अत्यावश्यक आहे, असे खा.सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले असून नसरापूर येथील महामार्ग क्र. ४८ महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार आहे.
वेल्हे तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला असून या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या बनेश्वर, अमृतेश्वर, किल्ले राजगड, तोरणा तसेच मढेघाट आदि वास्तू, किल्ले आणि देवस्थानांची येथे रेलचेल आहे. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे. याबरोबरच वेल्हे तालुका हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी फारश्या उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल. यामुळे वेल्हे तालुक्याशी आजूबाजूच्या परिसराचा संपर्क वाढून या परिसरातील पर्यटनासही चालना मिळेल. याबरोबरच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल. तरी कृपया महाड - रानवडी - कर्णवडी - मढेघाट - केळद - पासली - भट्टी - वेल्हे - आंबवणे - नसरापूर - चेलाडी फाटा रस्ता हा राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करून त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुळे यांनी केली आहे.
