[sakal]बारामती लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लावा
बारामती - बारामती लोकसभा मतदार संघातून जाणारे विविध राष्ट्रीय महामार्ग, प्रलंबित तसेच चालू असलेली कामे लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
दिल्ली येथे गडकरी यांची भेट घेऊन सुळे यांनी या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना लेखी निवेदन दिले. यात पालखी मार्गावरील नीरा जंक्शन आणि लोणंद सातारा रस्ता हे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करणे, पुणे सोलापूर रस्त्यावर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भुयारी मार्ग तयार करणे तसेच लोणी काळभोर, उरुळी कांचन, यवत, वरवंड, पाटस आदी गावांतील नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करणे, ही कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज सुळे यांनी बोलून दाखविली.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात वरवंड विभागात भुयारी मार्ग आणि सहजपुर येथे उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असून याबाबत स्थानिक नागरिक सातत्याने मागणी करत आहेत. ही बाब आपण यापूर्वीही लक्षात आणून दिल्याचे सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.
पुरंदर तालुक्यात सासवड रस्त्यावर हडपसर ते दिवे घाट या पालखी महामार्गाचे रुंदीकरण, भोर तालुक्यात करंदी-कांबरे आणि भाटघर धरणाकडे राजगड वेळवंड खोऱ्यातून जाणाऱ्या राज्य रस्त्यावर पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
वेल्हा तालुक्यातील अत्यंत महत्वाचा मढेघाट मार्गे महाड मध्ये जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्याबाबत खासदार सुळे यांनी पुन्हा एकदा आठवण करून देत निधीचीही मागणी केली आहे. याबरोबरच मुळशी तालुक्यातील भुगाव आणि घोटावडे फाटा येथे उड्डाणपूल उभारणी करण्याबाबत त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
हवेली तालुक्याच्या शहरी भागात येणाऱ्या खडकवासला मतदार संघात मुंबई बंगळूर बाह्यवळण महामार्गाला संलग्न असा वडगाव बुद्रुक येथील उड्डाण पुलापासून वारजे पर्यंत मुठा नदीवर बारा मीटर रुंदीचा पूल उभारणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांबाबत या वरील सर्व मागण्यांचा सरकारने सकारात्मक विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे सुळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
