1 minute reading time (294 words)

[sarkarnama]इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले

इर्शाळवाडीचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र धाडले

करुन दिली भोर, वेल्हे, मुळशीची आठवण...

 रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची घटना नुकतीच घडली आहे. यामध्ये आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा दाखल देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर तालुक्यातील काही भाग डोंगराळ असून अतिवृष्टीचे आहेत. या भागातील धोकादायक दरडी व रस्त्यालगतच्या कड्यांना तातडीने संरक्षक जाळी बसविण्यात याव्यात. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी युद्धपातळीवर ही कामे मार्गी लावावीत, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांना खासदार सुळे यांनी याबाबत पत्र लिहिले आहे. याबाबत दरवर्षी आपण पत्रव्यवहार करत असतो, अशी आठवण करून दिली. डोंगराळ भाग, रस्त्यांवरील घाटात, कडेकपारीतील सैल झालेले दगड पावसाळ्यात कोसळून दुर्घटना होतात. दरडी कोसळून रस्ता बंद झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते, असे सुळे यांनी पत्रात म्हटले आहे.

वाहतूक ठप्प होते. या पडलेल्या दरडी वेळच्या वेळी उचलण्यात याव्यात. तसेच ज्या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असेल त्या ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्यात या संदर्भात मी दर वर्षी पावसाळ्यापूर्वी आपणाकडे पत्रव्यवहार करत असते, अशी आठवणही सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना करुन दिली आहे.

या परिसरात माळीन, इर्शाळवाडी सारख्या दुर्घटना घडू नयेत या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. तसेच काही घाट रस्त्यांलगत संरक्षक कठड्यांची पडझड होऊ लागली आहे. बहुतांशी ठिकाणी संरक्षक भिंतीची व रस्त्यालगतच्या गटारांची दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी कोणत्याही क्षणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.

[maharashtralokmanch]हडपसर ते झेंडेवाडीदरम्यान पाल...
[maharashtralokmanch]डोंगराळ भागात दरडी कोसळू नये ...