[ABP MAJHA]रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का?
सुप्रिया सुळेंनी एका शब्दात विषय संपवला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्यातच आता रक्षाबंधनाचा सण जवळ आपल्याने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांचे बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना राखी बांधणार का? याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर सुप्रिया सुळेंनी एका शब्दात उत्तर देत विषय संपवला आहे.
अजितदादांना राखी बांधणार का?
सुप्रिया सुळेंनी आज पत्रकारांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांना अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी 'कळेल', असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील त्यांनी म्हटले. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असे त्यांनी म्हटले.
लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळेंचा पुन्हा सरकारवर निशाणा
लाडकी बहीण योजनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारताच्या जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देते. स्वातंत्र्याच्या मागे विचार होता. प्रत्येकाला मान सन्मान मिळाला पाहिजे. भारतरत्न बाळासाहेब आंबेडकर यांनी उत्तम संविधान दिलं. ज्यांनी योगदान दिलं त्यांना आम्ही अभिवादन करतो. मला काल सांगितलं की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप सुरु झाले आहे. भाजप आणि त्यांचे आमदार बोलतात की, आम्ही पैसे देणार नाही. एक नाही तर दोन-दोन आमदार बोलतात. हेच मग कुठेतरी पाणी मुरतंय, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला.
आता किती दिवस राहिलेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलींच्या सह्यावरून मोठा वाद झाल्याची माहिती समोर आली. नगरविकास खात्याची फाईल पूर्णपणे वाचल्याशिवाय मी सही करणार नाही, अशी भूमिका अजित पवारांनी घेतली. त्यावर तुमच्याकडून आलेल्या फाईलींवर मीही सह्या करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचे समजते. याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की,जे मॅनेजमेंटबद्दल मी बोले त्याचं उत्तर हेच आहे. राज्यात बेरोजगारी भ्रष्टाचार इतका आहे की याबाबत सगळा डेटा आम्हाला केंद्र सरकार देत आहोत. महिलांवर होणारे अत्याचार याचे आव्हान सरकार पुढे आहे. मात्र आता किती दिवस राहिलेत, असा टोला त्यांनी लगावला.
