[Time Maharashtra.]‘सरकार असंवेदनशील आहे, लोकांची सेवा या सरकारकडून होत नाही’, सुप्रिया सुळेंचा खोचक टोला
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील होते. विमान व्हीएसआर कंपनीचे होते, अशी चर्चा आहे. विमानातील बिघाडामुळे प्रवास दोन तास लांबला. तांत्रिक दुरुस्तीनंतर विमान संध्याकाळी ७ वाजता दिल्लीकडे निघाले. या घटनेमुळे लोकांच्या मनात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले, कारण सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवाने मृत्यू झाला होता.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, 'मला याबद्दल माहिती नव्हती. पार्थ आणि सुनेत्रा वहिनींची काळजी वाटली. जर विमानात तांत्रिक बिघाड झाला असेल, तर हा चिंताजनक विषय आहे.' त्यांनी कंपनीच्या विश्वसनीयतेवरही शंका उपस्थित केली आणि म्हटले की, व्हीएसआर कंपनीबाबत पूर्वीदेखील आरोप-प्रत्यारोप होत राहिले आहेत. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारवरही टीका केली. त्या म्हणाल्या की, 'सरकारकडे इतकी सत्ता असूनही संवेदनशीलतेचा अभाव दिसतो. शेतकऱ्यांच्या बाबतीत, समाजाच्या हितासाठी, लोकांच्या सेवेत सरकार दुर्लक्ष करत आहे. सत्ता मिळाल्यानंतरही लोकांची सेवा करण्याऐवजी फक्त अपमान आणि पक्षीय मनोवृत्ती चालू आहे.' त्यांनी भाजपवरही निशाणा साधत म्हटले की, 'जर १२ वर्ष सत्तेत असूनही हे सरकार सतत काँग्रेसचा उल्लेख करत राहते, तर त्यातील विरोधकांचे यश हेच खरे ठरते. आम्ही १२ वर्ष सत्तेत असतो तर आमच्या कामावरच बोलले असते, दुसऱ्या पक्षाच्या नावाचा वापर का?', असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे यांनी प्रवासाच्या खर्चावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, 'मध्यंतरीच पंतप्रधानांनी सर्वांना प्रवास खर्च कमी करण्याचे आवाहन केले आहे, तरीही महाराष्ट्र सरकार प्रायव्हेट विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर करत आहे की नाही, याची माहिती अद्याप स्पष्ट नाही.' ही घटना फक्त प्रवासात अडथळा निर्माण करणारी नव्हती, तर राजकीय वाद आणि सरकारच्या कामकाजावरील टीकेला चालना देणारी ठरली आहे. सुनेत्रा पवारांच्या विमानातील तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांमध्ये सुरक्षा चिंतेची भावना निर्माण झाली, तर राजकीय वर्तुळातही या प्रकरणावर चर्चेचे वादळ उठले आहे.

