[Loksatta]सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा?
"धमक्या देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम…"
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीची लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना बारामतीत रंगला होता. मात्र मैदानाबाहेरची लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी होती. या सामन्यात शरद पवारांनी बाजी मारली आहे. कारण सुप्रिया सुळे बारामतीतून चौथ्यांदा खासदार झाल्या आहेत. हा निकाल आपल्याला अनपेक्षित होता, पण आम्हीच कमी पडलो असं अजित पवारांनी म्हटलं आहे. अशात सुप्रिया सुळे या विजयाच्या सभा घेत आहेत. खडकवासला या ठिकाणी त्यांनी घेतलेली सभा, रोहित पवारांना दिलेला सल्ला सगळं चर्चेत आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
"कार्यकर्त्यांचा इतका उत्साह आहे की मला वाटतं आहे मी पहिल्यांदाच लोकसभा निवडून आले. ही निवडणूक सगळ्यांसाठीच नक्की वेगळी होती. आपले कार्यकर्ते आहेत त्यांनी निश्चय मनात पक्का केला आहे. खडकवासला भागात असेही लोक आहेत ज्यांनी अर्धा प्रचार माझा केला आणि अर्धा विरोधकांचा केला. असे खूप लोक आहेत, मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा वाईट वाटायचं पण आता काही वाटत नाही. ११ महिन्यांमध्ये बरीच गंमतजंमत झाली आहे. कुणी मिर्झापूर वेबसीरिज पाहिली असेल तर सांगते, अशी सीरिज बारामतीवर केली तर ती मिर्झापूर पेक्षा जास्त डेंजरस होणार आहे." असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं.
रोहित तुला आत्या म्हणून माझा सल्ला
रोहित, (रोहित पवार) तू मगाशी म्हणालास की आपल्याला बँकही लढवायची आहे. रोहित मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त एक सूचना देणार आहे. बँक जरुर लढा, जरुर जिंका, पण बँकेची कुठलीही शाखा आपली सत्ता आहे म्हणून २४ तास चालणार नाही. एवढी माझी एक आत्या म्हणून विनंती आहे. तू बँक चालव पण २४ तास नाही. मला उत्तर प्रदेशातल्या एका खासदाराने फोन केला तो म्हणाला ताई मुझे बँक अकाऊंट ओपन करना है, मी म्हटलं क्यूँ? तुम्हारे यहां पर २४ घंटे बँक चालू रहता है. बँक सुरु राहिली त्या प्रकरणात काम करणाऱ्याला तुरुंगात पाठवलं आहे. त्याची काही चूक नाही. ज्यांनी त्याला आदेश दिला त्याला पकडलं पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
धमक्या देणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार
"काही लोक तर धमक्या देतच फिरत होते. माझं एकावर तर फारच लक्ष आहे. मी वाटच बघते आहे तो परत कधी धमकी देतो. तो कुठे राहतो याचा पत्ता मला माहीत नाही. अर्ध्यावेळी नावही लक्षात राहात नाही. पण मला माणूस लक्षात आहे. सगळ्यात जास्त त्रास या संपूर्ण भागात धमक्यांचा कुणी दिला तर त्या व्यक्तीने दिला आहे. मी तेव्हा उमेदवार होते आता मी खासदार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात असले लोक फिरत असतील तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला माहीत आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याला दिलेली धमकी मी खपवून घेणार नाही. ज्याला कुणाला कळलं असेल त्याला कळलं असेल. आता कुणाचं काही करायची गरज नाही. जे उत्तर आपण द्यायची गरज होती ते उत्तर मतदारांनीच त्यांना दिलं आहे." असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
