[My Mahanagar]नाशिक-मुंबई महामार्गाच्या अवस्थेवरून सुप्रिया सुळेंची नाराजी
मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गाला ठिकठिकाणी पडलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे 150 किलोमीटरच्या प्रवासाला लागणारा चार ते साडेचार तासांचा प्रवास सध्या सात ते आठ तासांवर आला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भिवंडी परिसरातील गोदामांमधून ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांना वेळमर्यादा निश्चित केली जाणार आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्त्यांच्या अवस्थेवरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच महामार्गावर आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही केली आहे. (Supriya Sule displeasure over the condition of the Nashik-Mumbai highway)
सुप्रिया सुळे यांनी नाशिक-मुंबई महामार्गावरून प्रवास करतानाचा व्हिडीओ पोस्ट करत, तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टॅग केला आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले की, मुंबई-नाशिक महामार्गाची अतिशय दारुण अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे दुरवस्थेत अधिक भरच पडली आहे. या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागतो. मात्र एवढी रक्कम खर्च करूनही हा रस्ता सुरक्षित नाही. नागरीकांनी याबाबत विविध माध्यमांतून शासनाकडे तक्रारी मांडल्या, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरीकांचे हाल होत असून ही अतिशय खेदजनक बाब आहे. राज्यातील अनेक रस्त्यांची अशीच अवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
पावसामुळे सध्या नाशिक-मुंबई महामार्गाची दुरावस्था झाली आहे. महामार्गाचा भिवंडी वळण रस्त्यापर्यंतचा भाग राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या तीन यंत्रणांकडे विभागून असल्याने हा महामार्गाच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. याशिवाय ठाणे जिल्ह्यात महामार्गालगतच्या गोदामांमुळे अहोरात्र अवजड वाहनांची महामार्गाने ये-जा सुरू असते. त्यामुळे कोंडीत भर पडून वाहनधारक दोन-तीन तास अडकून पडतात. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य सरकार भिवंडी परिसरातील गोदांमातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. याशिवाय अवजड वाहनांसाठी वेळेची मर्यादा ठेवण्यात येणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गाची अतिशय दारुण अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे दुरवस्थेत अधिक भरच पडली आहे. या रस्त्यावरुन प्रवास करण्यासाठी मोठा टोल द्यावा लागतो. एवढी रक्कम खर्च करुनही हा रस्ता सुरक्षित नाही. नागरीकांनी याबाबत विविध माध्यमांतून शासनाकडे तक्रारी… pic.twitter.com/21ywzAv5Zo
— Supriya Sule (@supriya_sule) July 16, 2024