[mymahanagar]पती गमाविलेल्या महिलांसाठी ‘गंगा भागिरथी’ हा निर्णय घाईघाईत
तत्काळ निर्णय मागे घ्या- सुप्रिया सुळे
पती गमावलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार 'गंगा भागिरथी' हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे. (Ganga Bhagirathi decision for widowed women in haste Revoke the decision immediately Supriya Sule )
महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांसाठी घेतलेल्या निर्णयावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्षेप घेतला असून तसे ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.राज्यातील विधवा महिलांसाठी 'गंगा भागिरथी' असा शब्दप्रयोग करण्याबाबत सरकार विचार करीत आहे मात्र हे अतिशय वेदनादायी आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी व क्रांतीज्योती सावित्रीमाई अशा कर्तुत्ववान महिलांनी महाराष्ट्राची जडणघडण केली आहे. फुले-शाहू-आंबेडकर-साने-कर्वे यांच्या प्रागतिक विचारांचा महाराष्ट्र आहे याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करुन दिली आहे.
महिलांच्या बाबतीतील हा अतिशय संवेदनशील विषय हाताळत असताना व त्यासंबंधी मोठा निर्णय घेत असताना त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटनांना विश्वासात घेऊन व त्यांच्यासोबत विचार विनिमय करून मंत्री मंगलप्रभात लोढा आपण निर्णय घेतला पाहिजे अशी सूचनाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महाराष्ट्राचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी दि.१२ एप्रिल २०२३ रोजी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिवांना लिहिलेले व समाजमाध्यमांवर तसेच माध्यमांमध्ये व्हायरल झालेले पत्र वाचले. pic.twitter.com/Z9MCy1IiOy
— Supriya Sule (@supriya_sule) April 13, 2023
मंगलप्रभात लोढांचं स्पष्टीकरण
विधवांना गंगा भागिरथी (गंभा) म्हणण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. तसा अध्यादेश निघालेला नाही. महिला आयोगाकडून याचा केवळ प्रस्ताव आला होता. तो चर्चेसाठी पुढे पाठवला आहे, असा खुलासा मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी गुरुवारी केला.
पत्रकार परिषद घेऊन मंत्री लोढा यांनी हा खुलासा केला. महिला आयोग हा सरकारचा एक भाग आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. त्यांची नियुक्ती आमच्या काळात झालेली नाही. विधवांंना गंगा भागिरथी म्हणावे याचा प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे पाठवला. अजून काही संघटनांनी प्रस्ताव पाठवले आहेत. सर्व प्रस्ताव चर्चेसाठी संबंधित खात्याकडे पाठवले आहेत. त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. निर्णय झाला की आम्ही जाहिर करुच, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.