1 minute reading time (139 words)

[Saamana]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी करा!

माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी करा!

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

 7 फेब्रुवारी रोजी येणारी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावरून साजरी केली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संपूर्ण वर्षभरात महामानवांना अभिवादन करण्यासाठी प्रकाशित केल्या जाणाऱया यादीमध्ये माता रमाई यांच्या जयंतीचाही समावेश करण्यात यावा, असे त्यांनी नमूद केले आहे.

'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत त्यांच्या पत्नी माता रमाई यांचा मोठा वाटा आहे. माता रमाई यांची जयंती आंबेडकरी अनुयायी अतिशय उत्साहात साजरी करतात. समाधान, सहकार्य आणि सहिष्णुतेची मूर्ती असलेल्या माता रमाई यांनी समाजासाठी केलेला त्याग हा मोठा असून तो सर्वसामान्य जनतेपर्यंत व नवीन पिढीला मार्गदर्शक ठरण्याकरिता प्रबोधन, लोकशिक्षणाच्या हेतूने या वर्षीची त्यांची जयंती मोठय़ा प्रमाणात साजरी करण्याकरिता राज्य सरकारने निर्णय घ्यावा, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[Policenama]संपत्तीवाढीबाबतचा ‘एडीआर’चा अहवाल सुप्...
[Azad Marathi]माता रमाई यांची जयंती शासकीय स्तरावर...