2 minutes reading time (309 words)

[loksatta]“संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा…”

“संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा…”

सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी

महाराष्ट्रासह गुजरातमधील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आहे. पुणे, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, अहमदनगर परिसरात गारपिटीसह पाऊस कोसळला आहे. यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी, भुईसपाट, भाजीपाला, तूर, हरभरा अशा पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

'एक्स'वर (पूर्वीचं ट्विटर) पोस्ट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रात यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणीबाणीची परिस्थिती आहे. या अशा कठीण काळात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आपले पाहणी पथक पाठवून परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांसाठी मदतीची आग्रही मागणी करायला हवी. "

"संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवली तर तेथे केंद्र सरकारचे पथक जाऊन पाहणी करत असे आणि त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. आतादेखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा. यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचीदेखील पाहणी करण्याची मागणी करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभा करण्याच्या दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे. राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची ही वेळ आहे," अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. त्यांनी या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टॅग केलं आहे.

[maharashtratimes]'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी ...
[lokmat]"सुप्रिया सुळे वर्ध्यातून लोकसभा लढविणार?