2 minutes reading time (419 words)

[Maharashtra Lokmanch]महिला उद्योजकांनी नाविन्यतेसोबतच ‘मार्केटिंग’कडेही लक्ष द्यावे– खासदार सुप्रिया सुळे

महिला उद्योजकांनी नाविन्यतेसोबतच ‘मार्केटिंग’कडेही लक्ष द्यावे– खासदार सुप्रिया सुळे

 पुणे : भारतीय संस्कृतीप्रमाणे आज आपल्या प्रत्येक महिला उद्योजिकेकडे देखील नाविन्यता आहे. याचाच प्रत्यय मला आज 'विषय' या प्रदर्शनीमध्ये पुन्हा एकदा आला. या नाविन्यतेला मार्केटिंगची जोड मिळाल्यास महिला उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास आणखी सहकार्य मिळेल. त्यामुळे त्यांनी 'मार्केटिंग' कडेही लक्ष द्यावे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे ( MP Supriya Sule) यांनी केले. सुप्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा तुळसकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'विषय' या प्रदर्शनीला आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. डेक्कन जिमखाना येथील क्लब हाऊस या ठिकाणी सदर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनीच्या संयोजिका प्राची वाघ यादेखील या प्रसंगी उपस्थित होत्या. या सर्व महिला उद्योजकांना शिल्पा तुळसकर यांनी दिलेले हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने एक वेगळा आयाम देणारे आहे, असेही सुळे म्हणाल्या.

महिला उद्योजकांनी आपल्या वस्तूंना दिलेला 'पर्सन्लाईज्ड टच' त्या वस्तूंना खास बनवतो. आजच्या जगात नावीन्यतेमध्येही विविधता आणि दर्जा कायम राखणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी सांभाळत मार्केटिंगकडे लक्ष देत जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नक्की करावा, असेही सुळे यांनी सांगितले.

दिवंगत सुषमा स्वराज यांनी मला दोन वेळेस युनायटेड नेशन्सच्या कार्यक्रमासाठी न्यूयॉर्क येथे जाण्याची संधी दिली अशी आठवण सांगत सुळे म्हणाल्या, "या दोन्ही वेळेस मला सोयीची आणि माझा आत्मविश्वास वाढविणारी साडी मी नेसले. यादरम्यान जवळजवळ प्रत्येकानेच माझ्या पेहरावाचे कौतुक केले. आपली भारतीय वस्त्रपरंपरा ही जगभरात नावाजली गेलेली आणि जगाला आकर्षित करणारी आहे. त्यामागे कथा आहे, संस्कृती आहे आणि आपली परंपरा आहे हे विसरता कामा नये."

खरेदीच्या बाबतीत मी आळशी आहे, मात्र भारतीय वस्तू वापरण्यावर माझा विशेष भर असतो असे सांगत सुळे पुढे म्हणाल्या, "शहरातील सार्वजनिक ठिकाणी महिला उद्योजकांना स्थानिक प्रशासनाने एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे मला वाटते. महापालिका इमारत, मॉल, उद्याने आदी ठिकाणी ही व्यासपीठे असल्यास त्याचा महिला उद्योजकांना फायदा होईल आणि एका मोठ्या संधीच्या स्वरूपात समोर येईल असे मला वाटते. परदेशात एका विशिष्ट कंपनीची हँडबॅग विकत घेण्यासाठी ग्राहकांची रांग लागते आणि ग्राहक ती खरेदी करतात याचे मला आश्चर्य वाटते. मुळात एक 'बझ' तयार करण्यासाठी कंपनीची ती स्ट्रॅटेजी आहे हे लक्षात घ्यायला हवे आणि म्हणूनच सक्षम मार्केटिंग आपल्या महिला उद्योजकांनीही करावे असे मला वाटते."

विविध ब्रँड्सचे कपडे, साड्या, दागिने, अॅक्सेसरीज, होम डेकॉर यांसोबतच अनेकविध मातीच्या, हस्तकलेच्या वस्तू, बचत गटांनी बनविलेले पदार्थ यांचा मनसोक्त आस्वाद या प्रदर्शनीमध्ये दोन दिवस ग्राहकांना घेता आला. प्रदर्शनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोल्हापूरच्या चेतना फाउंडेशन, पुण्याच्या गुडविल इंडिया, सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून काही बचत गट अशा स्वयंसेवी संस्थांचेही स्टॉल्स होते. या अंतर्गत त्यांच्या सेवा आणि त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन देखील यावेळी उपस्थितांना पाहता आले.

[Maharashtra Lokmanch]कर्णबधिर मुले आणि ज्येष्ठांन...
[Saam tv]राज्यातले ED सरकार दडपशाही करुन भिती दाखव...