2 minutes reading time (312 words)

[abp Majhaa]टीडीएम चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

टीडीएम चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

म्हणाल्या 'दादांनी आणि मी हा चित्रपट...'

 दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा 'टीडीएम' (TDM) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटाचे थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात येणार आहे. 9 जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटासाठी नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी 'टीडीएम' हा चित्रपट पाहण्याचे आवाहन प्रेक्षकांना केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की सुप्रिया सुळे या म्हणतात,'आज इंदापूरला आल्यावर ऋषी मला भेटले, ऋषीनी टीडीएम नावाच्या सिनेमात काम केलं आहे.दादांनी आणि मी हा चित्रपट पाहिलाय.तुम्ही कधी पाहणार? नक्की चित्रपट पाहा, तुम्हाला नक्की आवडेल.'

सुप्रिया सुळे यांनी या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे यांची भेट झाली. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टि.डी. एम. या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. भेटीदरम्यान त्याचा कलाक्षेत्रातील प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले. त्याला 9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या. आपणही सर्वांनी हा चित्रपट नक्की पहा!'

टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्यानं या चित्रपटातील कलाकार भावूक झाले होते. त्यावेळी अजित पवार यांनी या चित्रपटाबद्दल एक ट्वीट शेअर केले होते. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, 'राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या चित्रपटाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी.'

[TV9 Marathi ]निवडणूक फायद्यासाठी नाही तर सेवा करण...
[divyamarathi]पुण्यातील मार्केट यार्डपासून मुळशी त...