[Loksatta]“भष्ट्राचाराचे आरोप पंतप्रधान मोदी, फडणवीसांकडूनच…”
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे. तसेच अजित पवारांवरील भष्ट्राचाराच्या आरोपांचं उत्तर भाजपानेच द्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
"सध्याची आर्थिक परिस्थिती काय आहे? याचा विचार सरकारने केला पाहिजे. ज्या प्रकारे सरकार कर्ज घेत आहे, निवडणूक समोर असल्याने सरकार फक्त जुमल्यांचा पाऊस पाडत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि पैसे वापरायचे, सत्तेत यायचे असे सुरु आहे. सरकारने गरीबांची मदत केली पाहिजे. पण किती कर्ज घ्यावे? आता बुलेट ट्रेन प्रोजेक्ट पाहा. बुलेट ट्रेन कोणीही मागितली नव्हती. या सर्वांचा विचार व्हायलाच पाहिजे. मला तरी हा अर्थसंकल्प पाहून काहीही आश्चर्य वाटलं नाही", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
"दिंडोरीचे खासदार, बीडचे खासदार बजरंग सोनवणे आणि मी (सुप्रिया सुळे) आम्ही सर्वांनी मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली आहे. यावेळी पियूष गोयल यांच्याशी आम्ही दूध, साखर आणि कांद्याच्या निर्यातीबाबत आणि आयातीसंदर्भात सरकाचं घोरण नेमकं काय आहे? याबाबत माहिती घेतली. मात्र, सरकारचा एखादा निर्णय आणि त्याचा परिणाम हा एक दिवसाचा नसतो. ग्रामीण भागातील जनतेनं एनडीए सरकारला पूर्णपणे नाकारलं आहे", अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
दरम्यान, अजित पवार यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यांनी अर्थसंकल्पातील अनेक तरतुदींचा उल्लेख केला. तसेच त्यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपासंदर्भातही त्यांनी भाष्य केलं आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अजित पवार यांच्यावरील भ्रष्ट्राचाराच्या आरोपावर महाविकास आघाडी उत्तर देऊ शकत नाही, तर महायुतीने उत्तर दिलं पाहिजे. कारण अजित पवार यांच्यावर आरोप हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनी अजित पवारांवर आरोप केले. त्यामुळे याचं उत्तर त्यांनाच विचारलं पाहिजे", असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.