[Lokmat]बाजारात तेलाच्या डब्याची किंमत २,६८० रुपयांवर पोहोचली
५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा - सुप्रिया सुळे
"पुणे : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई, वाढती महागाई आणि शेतमालाचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. इंदापूर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली ५ हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचे सांगत त्यांनी हेक्टरी १ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.
महागाईच्या काळात ५ हजार रुपयांत काय होणार?शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीवर प्रश्न उपस्थित करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बाजारात तेलाच्या एका डब्याची किंमत २,६८० रुपयांवर पोहोचली आहे. अशा स्थितीत सरकार ५ हजार रुपये देऊन दिवाळी साजरी करायला सांगत आहे, यात शेतकऱ्यांचे काय होणार? शेतकऱ्यांच्या हक्काचे जुने पैसे अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने द्यावी.
प्रशासकीय ढिसाळपणा आणि अटींवर संतापदुष्काळात नरेगाची कामे, विहिरींच्या परवानग्या आणि टँकर वाटपाचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्याची मागणी त्यांनी केली. "पीक जळाले तरी फोटो काढा, पाणी आले तरी फोटो काढा, अशा जाचक नियमांत शेतकऱ्यांना अडकवले जात आहे. आधुनिक तंत्रज्ञान असताना शेतकऱ्यांना नाहक त्रास का दिला जातोय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विकास आणि पर्यावरणाचा समतोल हवाप्रकल्पांच्या नावाखाली होणाऱ्या वृक्षतोडीवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, विकासाला विरोध नाही, परंतु पर्यावरणाचा समतोल राखलाच पाहिजे. स्थानिक लोकांना विश्वासात न घेता निर्णय घेणे चुकीचे आहे. २०० आमदारांचे पाठबळ असलेले हे डबल इंजिन सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून, या सरकारचे इनकमिंग बंद झाले असून केवळ आउटगोइंगच सुरू आहे, असा खोचक टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.

