[Lokmat]होडीचा प्रवास जीवघेणा! भीमा नदीवर आगोती ते गोयेगाव-वाशिंबे दरम्यान पूल उभारण्यात यावा - सुप्रिया सुळे
"इंदापूर : उजनी जलाशयात भीमा नदीवर इंदापूर तालुक्यातील आगोती ते करमाळा तालुक्यातील गोयेगाव (वाशिंबे) दरम्यान पूल उभारण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात खासदार सुळे यांनी म्हटले आहे की, आगोती ते गोयेगाव वाशिंबे हे अंतर अवघे ४ किलोमीटर आहे. उजनी जलशयामुळे या दोन गावांतील नागरिकांना भिगवण- टेंभुर्णी मार्गे वळसा मारून रस्त्यामार्गे तब्बल ९० ते १०० किलोमीटर इतके अंतर प्रवास करून जावे लागते. पैसे व वेळेच्या बचतीसाठी लोक होडीतून प्रवास करतात. परंतु हा प्रवास धोकादायक आहे. यापूर्वी अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे उजनी जलाशयात आगोती ते गोयेगाव -वाशिंबे दरम्यान पूल बांधण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
उजनी धरण होण्यापूर्वी गोयेगाव ते अगोती दरम्यान नदीपात्रातून बैलगाडीद्वारे वाहतूक होत असे. सध्या याठिकाणी बोटीतून वाहतूक सुरू आहे. गोयेगाव ते आगोती दरम्यान भीमा नदीच्या पात्राची रुंदी ही कमी आहे. दोन्ही किनाऱ्यापर्यंत रस्ते उपलब्ध आहेत. त्यामुळे जमीन संपादनाची ही आवश्यकता भासणार नाही. दोन्ही बाजूकडून ३०० ते ४००मीटरपर्यंतचे भराव भरून मुख्य नदीपात्रात पूल झाल्यास येथील विकासाला निश्चित चालना मिळेल. स्थानिक नागरिकांच्या सोयीचा विचार विचार करता या ठिकाणी पूल बांधण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, असे त्यांनी गडकरी यांना लिहिलेल्या पत्रात शेवटी नमूद करण्यात आले आहे.