[sakal]'नॅचरल करप्ट पार्टी' असल्याची चौकशी करा!
सुप्रिया सुळेंचे PM मोदींना आव्हान
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी पार्टीला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. राष्ट्रवादी पार्टीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. या आरोपांची चौकशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावीच, माझ्या पक्षाचा या चौकशीला पूर्ण पाठिंबा राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनात आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण केले. या भाषणाची संधी घेत खासदार सुळे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसवर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात प्रचार करताना पंतप्रधान मोदींनी एनसीपी म्हणजे नॅचरल करप्ट पार्टी असे संबोधले होते. तसेच काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशात एका जाहीरसभेत बोलताना एनसीपीने 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर काही दिवसानंतरच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
या आरोपांचा संदर्भ देत खासदार सुळे म्हणाल्या, पंतप्रधानांनी केलेल्या या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. माझ्या पक्षाचा या चौकशीला संपूर्ण पाठिंबा राहिला. आता चौकशीच करून घ्या, असे आव्हान दिले. या आव्हानाचे एनसीपीच्या इतर सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.
