शिर्सुफळ : बारामती तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जलसंधारणांची कामे झाले आहेत. यासाठी प्रशासनासह विविध खाजगी कंपन्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे. या कामांमुळे उन्हाळ्यात भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या कायमची सुटेल असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
बारामती मधील गाडीखेल येथे सकाळ रिलीफ फंड, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व मगरपट्टा सिटी यांच्या माध्यमातुन ओढा खोलीकरण करण्यात आले. या ठिकाणी पियाजिओ व्हेईकल्स कंपनीच्या सीएसआर निधीतुन बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्यामध्ये साठलेल्या पाण्याचे पुजन, गुणवंत विद्यार्थी सत्कार, व गावभेट दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर, सरपंच बाळासाहेब आटोळे, उपसरपंच नानासाहेब जगताप, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुळे म्हणाल्या ''खाजगी कंपन्यांनी आपल्या नफ्यातुन दोन टक्के निधी हा सामाजिक विकासकामांसाठी राबविण्याचा निर्णय हा आघाडी
सरकारच्या कालखंडात घेतलेला निर्णय आहे. यामाध्यमातुन सर्वत्र विविध कंपन्यांच्या माध्यामातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरु आहेत. यामध्ये बारामती तालुक्यात सकाळ रिलीफ फंड, भारत फोर्ज, अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, मगरपट्टा सिटी, शरयू फाउंडेशन यांच्या सारख्या संस्थाच्या माध्यमातुन होत असलेली जलसंधारण, शैक्षणिक कामे समाधानकारक आहेत. याचे सुखद परिणाम भविष्यात दिसतील.'' यावेळी खा.सुळे यांच्या हस्ते दहावी व बारावीच्या परिक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तसेच सुळे यांनी गाडीखेल अंर्तगत येणाऱ्या धायतोंडेवस्ती येथील आयएसओ मानांकन ठरलेल्या अंगणवाडीची पाहणी केली व अंगणवाडीच्या रंगरंगोटी व इतर सुविधा पाहुन समाधान व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी मांडलेल्या मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल दळवी, शरद शेंडे, राणी गाढवे, संगिता धायतोंडे, लिलाबाई दळवी, माजी सरपंच दिलीप आटोळे, रायचंद आवदे, दादा आटोळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी सरपंच अनिल आटोळे यांनी केले.
http://www.esakal.com/pune/supriya-sule-appreciates-water-conservation-128844