1 minute reading time (271 words)

विद्यार्थ्यांना 'चाचा चौधरी आणि मोदी'चे धडे

विद्यार्थ्यांना 'चाचा चौधरी आणि मोदी'चे धडे

Maharashtra Times | Updated: May 29, 2018, 03:26AM IST म. टा. प्रतिनिधी, पुणे

विद्यार्थ्यांना 'चाचा चौधरी आणि मोदी'चे धडे

बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातून भारतीय जनता पक्षाचा राजकीय संदेश दिल्यानंतर आता सर्व शिक्षा अभियानातून जिल्हा परिषदेच्या प्राथामिक विभागाच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी चक्क 'चाचा चौधरी आणि मोदी' असे पुस्तक देण्यात आले आहेत. या पुस्तकातून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकात मोदींचे गुणगान करण्यात आले आहे. दरम्यान, मोदींऐवजी संत गाडगे बाबा यांच्यासारख्या थोरपुरुषांचे महत्त्व सांगितले असते, तर बरे झाले असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगाविला.

सुळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत हे पुस्तक दाखविले. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी जिल्हा परिषदेच्या पुस्तकांचा सेट नुकताच मिळाला असून ती पुस्तके येत्या काळात विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ६९ विषयांवर पुस्तके शाळांना पाठविण्यात आली आहेत. त्यापैकी 'चाचा चौधरी आणि मोदी' हे एक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आणि मलपृष्ठावर मोदींचे मोठे छायाचित्र असून पुस्तकांमध्ये मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती एकप्रकारे जाहिरातींद्वारे सांगण्यात आली आहे. तसेच, या योजना रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये उघड्यावर शौच करू नये, परिसर स्वच्छ ठेवा, घरात शौचालये बनवा, स्वच्छता अभियान अशांची माहिती सांगितली आहे. या पुस्तकामध्ये चाचा चौधरींचे छायाचित्र लहान, तर मोदींचे छायाचित्र मोठे छापले असून विद्यार्थ्यांचे लक्ष छापील मजकूरांपेक्षा मोदींवर कसे जाईल, याची पुरेपुर काळजी घेतल्याचे ठळकपणे दिसून येते. या पुस्तकात प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर पोहोचविण्याची उज्ज्वला योजना, मुलींच्या शिक्षणासाठी मुली वाचवा, मुली शिकवा, नोटबंदीद्वारे काळा पैसा आणि गुन्हेगारी घडामोडींवर प्रतिबंध, डिजिटल इंडिया, वस्तू व सेवा कर (जीएसटी) अशा योजनांची माहिती दिली आहे. दरम्यान, या पुस्तकांद्वारे केंद्र सरकार आपल्या योजनांचे मार्केटिंग करीत असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले.

https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/chacha-chaudhary-books-for-student/articleshow/64359561.cms

आम्ही काय खोटे बोललो, हे स्पष्ट करावे
शिक्षणमंत्री तावडे यांचाच शाळाबंदीचा डाव, खासदार स...