[Sakal]राष्ट्रीय जल अकादमीची जागा क्रीडांगण, उद्यान उभारणीला द्यावी
सुप्रिया सुळेंची मागणी
खडकवासला : नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे केंद्र सरकारकडे केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील अकादमी आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. राष्ट्रीय जल अकादमी ही केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
या जागेवर परिसरातील नागरीकांनाठी क्रीडांगण तथा उद्यान उभारले गेल्यास त्याचा नागरीकांना फायदा होऊ शकेल, असे त्यांनी शेखावत यांना सांगितले. खडकवासला आणि आसपासच्या परिसरात मुलांना खेळण्यासाठी मोठे मैदान तसेच एखादे मोठे उद्यान नाही. त्यामुळे जल अकादमीच्या मोठ्या जागेत हे प्रकल्प राबवता येऊ शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले. याबरोबरच बारामती लोकसभा मतदार संघात ' 'जल जीवन मिशन' अंतर्गत कामांसाठी जलसक्ती मंत्रालयाने केलेल्या सहकार्यासाठी त्यांनी शेखावत यांचे आभारही मानले.
