[loksatta]सुप्रिया सुळेंचं ‘ते’ विधान अजित पवारांसाठी नव्हतं?
स्वत:च स्पष्टीकरण देत म्हणाल्या…
नुकत्याच संपलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये जवळपास पूर्ण सदस्यांच्या पाठिंब्याने मंजूर झालं. निवडणुकांमध्ये महिलांना ३३ टक्के जागा आरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण जनगणना व मतदारसंघ पुनर्रचना झाल्याशिवाय हा लाभ महिला उमेदवारांना घेता येणार नाही. मात्र, या चर्चेदरम्यान अमित शाहांच्या टिप्पणीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. हे विधान सरकारमध्ये सामील झालेल्या अजित पवारांना उद्देशून असल्याचं बोललं जात आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
नेमकं काय घडलं होतं?
लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा चालू असताना सुप्रिया सुळेंनी अमित शाह यांच्या एका टिप्पणीवर विधान केलं होतं. "भाजपाकडून सर्व पुरुषांना बोलायची संधी दिली जात आहे" असं अधीर रंजन चौधरी म्हणाले. त्यावर अमित शाह यांनी "महिलांच्या मुद्द्यावर फक्त महिलांनीच बोलावं का? पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी बहिणींच्या हिताचा विचार करणं ही देशाची परंपरा आहे", असं अमित शाह म्हणाले. त्यावर "बहिणीच्या कल्याणाचा विचार करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळेंनी हे विधान अजित पवारांनाच उद्देशून म्हटल्यायची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. त्यावर पुण्यात माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी स्पष्टीकरण दिलं.
"अमित शाह म्हणाले की एका पुरुषानं जर महिला आरक्षणाचं विधेयक आणलं, तर काय हरकत आहे. जर एखादा भाऊ असं वागत असेल तर काय चूक आहे. मी त्यांना एवढंच म्हटलं की काश्मीर ते कन्याकुमारी सगळेच भाऊ प्रत्येक बहिणीचं हित बघतातच असं नाही. मी तुम्हाला अशी असंख्य उदाहरणं सांगू शकते. त्यामुळे माझं विधान फक्त अमित शाह यांच्या वक्तव्यांबाबत होतं", असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
रमेश बिधुरींच्या वक्तव्याचा समाचार
दरम्यान, भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत सपा खासदार दानिश अली यांच्यावर "दहशतवादी, बाहेर फेका याला" अशी टिप्पणी केली होती. त्यावरूनही सुप्रिया सुळेंनी भाजपाला टोला लगावला. "सरकार दरबारी भाजपाचे खासदार ज्या पद्धतीने शब्द वापरतात, हे दुर्दैवी आहे. त्या खासदारांच्या विरोधात मी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवलं आहे.चांगल्या पद्धतीने कामकाज चाललं. पण त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम भाजपाच्या असंस्कृत खासदारानं केलं आहे. त्यांनी याआधीही अनेकदा अशा गोष्टी केल्या आहेत. काल कनिमोळी भाषण करायला उभ्या राहताच त्याच खासदारांनी त्यांच्यावर आरडाओरड करायला सुरुवात केली. भाजपाच्या खासदारांची ही प्रवृत्ती आहे. त्याला भाजपा खतपाणी घालतेय. भाजपाचा दुतोंडी चेहरा इथे दिसतोय", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.