2 minutes reading time
(371 words)
Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues
May 24, 2018
Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues
Supriya Sule meets NDA authorities to resolve Ahiregaon issues
एनडीए भागातील स्थानिक गावांच्या समस्या सुटण्यास मदत
पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या पलीकडे असलेले हवेली तालुक्यातील अहिरे हे गाव आणि त्यालगतच्या सोनारवाडी, खाडेवादी, वांजळेवाडी आणि मोकरवाडी येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात काही अंशी यश आले आहे. एनडीएच्या आवारातील धनगर बाबा मंदिरात पूजा करण्यास परवानगी मिळाली असून मोकरवाडी बसस्थानकाबाबतही प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल (दि. २३) पुन्हा एनडीए प्रशासनासोबत बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. या बैठकीत अहिरेबरोबरच शिवणे, कोपरे, उत्तमनगर, आणि कोंढवे या गावांतील नागरिकांच्या मागण्यांसाठी एक प्रतिनिधी नियुक्त करावा, असा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मोकरवाडी येथील बसथांब्याबाबतही प्रबोधिनी सकरात्मक असून यात लक्ष घालू असे आश्वासन देण्यात आले आहे. प्रबोधिनीच्या संरक्षणाबरोबरच या भागात राहणाऱ्या भूमिपुत्रांचे हक्कही तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे प्रबोधिनीने जास्त कठोर न होता मध्यम मार्ग काढावा या मागणीसाठी गेल्या महिन्यात २५ एप्रिल रोजी त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले होते. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार काल एनडीच्या मुख्यालयात बैठक घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, अनिता इंगळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अहिरे हे गाव आणि चार वाड्या या प्रबोधिनीला लागून पण पलीकडील बाजूस असल्याने येथील नागरिकांना प्रबोधिनीच्या ह्द्दीतूनच यावे-जावे लागते. त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. नागरिकांची ही गरज ओळखून प्रबोधिनी प्रशासनाने प्रबोधिनीचे गेट क्र. १० त्यांच्यासाठी उघडून दिले आहे. त्यासाठी पूर्वी पहाटे चार ते रात्री साडेबारा अशी वेळ ठेवली होती. परंतु अचानक ही वेळ कमी करून पहाटे पाच ते रात्री साडेदहा अशी केली. या बदलामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. मुलांच्या शाळांपासून ते अगदी ज्येष्ठ नागरिक आणि महिला वर्गाला आजार आदि प्रसंगी रूग्णालयापार्यंत जाण्यात सुद्धा अडचणी येत आहेत. याशिवाय या लोकांना दैनंदिन व्यवहारातही अनेक छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत.
या परिसरात राहणारी जवळपास सगळीच कुटुंबे शेतकरी आहेत. त्यांची दुभती जनावरे गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि शेतमाल बाजारात घेऊन जाणे त्यांना अत्यंत जिकीरीचे झाले आहे. दूध घेऊन शहरात येण्यासाठी त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. याशिवाय नित्य पूजा अर्चा, मंदिरात दर्शनाला जाणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या प्रबोधीनिशी वारंवार पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आंदोलनही केले होते. काल पुन्हा बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करत सकारात्मक तोडगा काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.