1 minute reading time (292 words)

बोफोर्सचा न्याय 'राफेल'लाही लावा, वादानंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

'राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे.'


Updated On: Sep 28, 2018 08:27 PM IST

मुंबई,ता.28 सप्टेंबर : बोफोर्सचं प्रकरण गाजत असताना भाजपने संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीची मागणी केली होती. आता राफेल च्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असताना तोच न्याय लावत सरकारने 'जेपीसी'मार्फेत चौकशी करावी हीच शरद पवारांची भूमिका आहे असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी दिलं. राफेलची किंमत 300 पटीने वाढविण्यात आली असा आरोप होतेय त्याचाही खुलासा झाला पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. बोफोर्सचा न्याय 'राफेल'लाही लावा, वादानंतर सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'न्यूज18 लोकमत'ला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान मोदी आणि राफेल बाबत त्यांची भूमिका मांडली होती. राफेल प्रकरण गाजत असतानाही लोकांना पंतप्रधान मोदींच्या भूमिकेबद्दल संशय नाही असं पवार म्हणाले आणि त्यानंतर देशभर राजकीय क्षेत्रात वादळ निर्माण झालं.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांची काय भूमिका होती ते पुन्हा एकदा स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या पवार साहेबांच्या मुलाखतीचा सोईस्कर अर्थ काढण्यात आला आहे. राफेलच्या वाढलेल्या किंमतीचं शंकानिरसन आणि त्या प्रकरणाची जेपीसी मार्फत चौकशी अशा दोन्ही मागण्या पवार साहेबांनी केल्या आहेत त्यामुळं वादाचं काय कारण आहे तेच कळत नाही.

या वादानंतर पक्षाचे जेष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला होता. तारिक भाईंनी किमान एकदातरी पवारांना फोन करून विचारायला पाहिजे होतं. तारिक भाई, आपने दिल तोड दिया अशी खंतही त्यांनी तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यावर व्यक्त केली.

पण सगळा वाद सुरू झाला तो पवारांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावरून. लोकांना मोदींच्या हेतूबद्दल शंका नाही असं पवार मुलाखतीत म्हणाले होते. असं म्हणणं म्हणजे मोदींना प्रशस्तीपत्रच आहे अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मोदींना चोर म्हणत असताना लोकांची मोदींच्या हेतूवर शंका नाही हे पवारांचं वक्तव्य वादळ निर्माण करणारं ठरलं. वादाचं कारण ठरलेल्या त्या वक्तव्यावर मात्र सुप्रियाताईंनी काहीही मत व्यक्त केलं नाही.

https://lokmat.news18.com/national/supriya-sule-clarification-on-sharad-pawars-statement-307718.html
मंदिरातील ड्रेसकोडऐवजी महिला सुरक्षेवर लक्ष देण्या...
पवारांनी मोदींना क्लीन चीट दिलीच नाही, सुप्रिया सु...