4 minutes reading time (759 words)

[Divya Marathi]देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे का?:सुप्रिया सुळे म्हणाल्या

देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे का?:सुप्रिया सुळे म्हणाल्या

विमानात घुसून तरुणांना अटक करणे ही संविधानाची हत्या; हात जोडून विनंती, आमच्या मुलांना सोडा!

"देशात शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या तरुणांवर गुन्हेगारांसारखी कारवाई केली जात आहे. विमानामध्ये प्रत्यक्ष घुसून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे हे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि संविधानाची उघड हत्या करणारे आहे. पाठीवर बॅकपॅक घेऊन रस्त्यावरून चालणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांनाही संशयावरून उचलले जात आहे. हे चित्र पाहता देशात 'अघोषित आणीबाणी' सुरू झाली आहे का, अशी तीव्र भीती वाटत आहे. राज्यकर्त्यांचे काम जनतेचे ऐकणे असते, विद्यार्थ्यांवर लाठीमार करणे नव्हे. मी केंद्र सरकारला हात जोडून विनंती करते की, आमच्या निष्पाप मुलांवर दडपशाही करू नका, त्यांना तात्काळ सोडून द्या," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली.

नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके, सौरव दास यांच्यासह अनेक तरुणांना दिल्ली विमानतळावर विमानात घुसून पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानाकडे निघालेले महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध केला.

विमानात जाऊन अटक करण्याची काय गरज होती?

अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दिल्ली विमानतळावर झालेल्या कारवाईचा तीव्र निषेध करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अभिजीत दिपके आणि त्यांची टीम अत्यंत शांततेने दिल्लीत जात होती. त्यांचे विमान धावपट्टीवर उतरताच पोलिसांनी विमानात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. मला सांगा, अशी काय आणीबाणी आली होती? त्यांची मागणी काय होती? हजारो लोक जंतरमंतरवर जाऊन लोकशाही मार्गाने बसतात. आपण सत्तेत असताना आणि विरोधात असतानाही अनेकदा जंतरमंतरवर गेलो आहोत. हा शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला, तुम्हाला, तुमच्या कॅमेरामॅनला आणि या देशातील प्रत्येक नागरिकाला दिला आहे. अशा पद्धतीने विमानात घुसून केलेली कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक आहे."

"हे सरकार पूर्णपणे संविधानविरोधी बनले आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवर घाला घालून जनतेचा आणि तरुणांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे."

दिल्लीत पाठीवर बॅग दिसली तरी उचलतात; देशात आणीबाणीसारखी भीती

दिल्लीतील छावणीसदृश वातावरणावर चिंता व्यक्त करत त्यांनी सांगितले. "दिल्लीचे अनेक मेट्रो स्टेशन बंद केले गेले, संपूर्ण शहराला छावणीचे रूप दिले गेले. आज दिल्लीत कोणताही तरुण पाठीवर बॅग घेऊन फिरताना दिसला, तरी त्याला पोलीस संशयावरून ताब्यात घेत आहेत, अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवरून येत आहेत. एका वाहिनीने तर असेही सांगितले की, इथे पकडले गेलात तर भविष्यात पासपोर्ट मिळण्यात अडचणी येतील. या धमक्यांमुळे आणि कारवाईमुळे देशातील तरुण मुले प्रचंड भयभीत झाली आहेत."

लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नाही का?

"आपण लोकशाहीत जगत आहोत. आपल्या देशातील तरुण पिढीने एकत्र येऊन आपले म्हणणे मांडायचे नाही का? ते काही वेगळे मागत नाहीत, शांततेने आणि प्रेमाने आपले प्रश्न मांडत आहेत. त्यांच्यावर अन्याय का केला जात आहे? हा संपूर्ण प्रकार हुकूमशाहीकडे झुकणारा असून आणीबाणीच्या काळातील वातावरणाची आठवण करून देणारा आहे."

50 जणांवर गुन्हे असले तरी 450 निष्पाप मुले आहेत; बहुमताचा नियम कुठे गेला?

सुरक्षेच्या कारणावरून 500 आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंनी परखड भाष्य केले. "प्रशासनाकडून सांगितले जात आहे की ताब्यात घेतलेल्या 500 लोकांपैकी सुमारे 50 जणांवर गुन्हेगारी नोंदी आहेत. जर 50 जणांवर नोंदी असतील, तरी उर्वरित 450 जण ही निष्पाप विद्यार्थीच आहेत ना? म्हणजे 90 टक्के तरुण हे सामान्य विद्यार्थी आहेत. लोकशाहीत नेहमी बहुमताचा सन्मान केला जातो, मग इथे 90 टक्के निष्पाप मुलांचा आवाज का दाबला जातोय? सरकारची जबाबदारी मुलांचे ऐकून घेण्याची आहे, त्यांच्यावर लाठ्या उगारण्याची नाही. ती मुले तुमची, माझी आणि या देशाची मुले आहेत."

ज्ञानेश कुमारांनी राजीनामा द्यावाच लागेल आणि निवडणूक सुधारणा कराव्याच लागतील!

'इंडिया' आघाडीच्या मागण्यांचा पुनरुच्चार करताना त्यांनी दोन महत्त्वाचे मुद्दे मांडले. "आमच्या दोन स्पष्ट मागण्या आहेत. पहिली म्हणजे, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. आणि दुसरी म्हणजे, देशात तातडीने सर्वसमावेशक निवडणूक सुधारणा लागू केल्या पाहिजेत. केवळ एका व्यक्तीला पदावरून हटवून चालणार नाही; तर भविष्यात निवडणुका पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हाव्यात यासाठी ठोस यंत्रणा हवी. आम्ही देशाच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी हा लढा लढत आहोत."

तुषार गांधींच्या अटकेवर आश्चर्य नाही

मुंबईत तुषार गांधी यांना ताब्यात घेतल्याच्या वृत्तावर त्या म्हणाल्या, "या सरकारमध्ये जो कोणी व्यवस्थेला प्रश्न विचारेल किंवा बोलेल, त्याला ताब्यात घेतले जात आहे. त्यामुळे तुषार गांधींना ताब्यात घेतल्याचे ऐकून मला अजिबात आश्चर्य वाटले नाही. हे लोकशाहीची हत्या करण्याचेच काम आहे."

शेवटी केंद्र सरकारला आवाहन करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "राजकारणातील वाद बाजूला ठेवा, परंतु देशाच्या उमेदीच्या तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करू नका. मी हात जोडून विनंती करते की, ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कसलीही इजा न पोहोचवता तत्काळ मुक्त करा." 

...

Supriya Sule Slams Delhi Police Arrests; Calls It Undeclared Emergency

Supriya Sule slams Delhi police for arrests, calls it undeclared emergency. Latest Updates. देशामध्ये शांततेच्या मार्गाने, संविधानाच्या चौकटीत राहून आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या तरुणांवर गुन्हेगारांसारखी कारवाई केली जात आहे. विमानामध्ये प्रत्यक्ष घुसून कार्यकर्त्यांना ताब्यात घेणे हे अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि संविधानाची उघड हत्या करणारे आहे.
[NDTV Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार प...
[ET Now]‘Constitution Is Being Murdered’: Supriya ...