[ TV 9 Marathi] साडीने पेट घेतला, सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या
सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, विनंती आहे की…
पुणे: हिंजवडी येथील एका कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. यावेळी सुप्रिया सुळे थोडक्यात बचावल्या. साडीने पेट घेतल्याचं सुप्रिया सुळे यांच्याच लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी तात्काळ आग विझवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रकृतीची विचारपूस सुरू केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. मी सुखरुप आणि सुरक्षित आहे. कुणीही काळजी करू नका, असं आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील हिंजवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कराटे स्पर्धेचे उद्घाटन करत असताना अनवधानाने साडीने पेट घेतला. पण वेळीच ती आग आटोक्यात आणण्यात आली.
आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाची आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे आणि बारामतीत त्यांच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज बारामतीतील हिंजवडीत कराटे स्पर्धेच्या शिबारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आलं.
सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी सुप्रिया सुळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आला. पुतळ्याच्या समोरच एक समई तेवत होती. यावेळी पुतळ्याला हार घालताना अचानक सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतला. गरम वाफ लागल्यामुळे सुप्रिया सुळे तात्काळ सावध झाल्या अन् साडीच्या पदराला आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी तात्काळा हातानेच आग विझवली. आग जास्त मोठी नव्हती, त्यामुळे ही आग पटकन विझल्या गेली. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. आयोजकांनी तात्काळ स्टेजच्या दिशेने धाव घेतली. पण तोपर्यंत आग विझवण्यात आली होती.
या घटनेत सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झाली नाही. पण साडीचा पदर जळाला आहे. आग लागल्याची घटना घडल्यानंतरही सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आणि उपस्थितांना मार्गदर्शन केलं. तसेच खेळाडूंचा उत्साह वाढवला.