[Sakaal]देशातील आदर्श ग्रामपंचायत माणचा मला अभिमान - खा. सुप्रिया सुळे
हिंजवडी - मूलभूत नागरी व पायाभूत सुविधा प्रभावीपणे पूरवीत सर्वांगीण विकासद्वारे गावचा कायापालट करण्याबरोबर आयटीच्या झगमगाटातही शेती, अध्यात्म, शिक्षण, संस्कार व संस्कृतीची जपणूक करणाऱ्या व देशातील व राज्यातील प्रत्येक पुरस्कार पटकविणाऱ्या आदर्श माण गावाचा मला अभिमान असल्याचे गौरोदगार खासदार सुप्रिया सुळे यांनी माण येथे काढले.
माण (मुळशी) ग्रामपंचायतीने सात कोटी निधीतून तीन एमएलडी क्षमता असलेले मैला शुद्धिकरण प्रकल्प (एसटीपी) उभारले आहे. असा प्रकल्प उभारणारी माण ग्रामपंचायत राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या प्रकल्पाचे उदघाटन गुरुवारी (ता. १६) सुळे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, हिंजवडी व माणमधील महिला बचत गटांना विविध प्रकारचे ट्रेनिंग देणार आहे. या बचत गटांचे शॉपिंग मॉल असणारे माण हे पहिले गाव असणार आहे. महागाई व प्रंचड बेरोजगारी वाढली, सत्ता बदल होताच पुणे जिल्ह्याच्या विकासाचा वेग मंदावला.
सुरेश पारखी यांनी येथील गंगाराम वाडीला रस्ता नाही, जय गणेश कॉलनीतील पाणी व इतर नागरी समस्या सोडविण्याची मागणी केली. माणच्या पाणी पुरवठयात दुजाभाव होत असल्याची ग्रामस्थांची भावना आहे, मुळशी प्रादेशिक टप्पा दोनची योजना लवकर सुरू झाली तर पूर्व गावातील १४ गावांचा पाणी प्रश्न मार्गीलागेल. एमआयडीसीने शेतकऱ्यांच्या जमिनींवरील शिक्के काढून त्यांना विकसनासाठी द्यावीत हे प्रश्न सुळेंनी सोडवून द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महादेव कोंढरे यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, माजी सभापती पांडुरंग ओझरकर, सरपंच अर्चना आढाव, उपसरपंच शशिकांत धुमाळ, विस्तार अधिकारी सुनिल जाधव, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, कुंडलिक जांभूळकर, अंजली कांबळे, कोमल वाशिवले, दीपाली कोकरे, सागर साखरे, संदीप साठे, दगडू करंजावणे, रवि बोडके, पंडित गवारे, देविदास सावंत, सचिन आढाव, अमृता हिंगडे, योगेश शिंदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते. गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष राम बोडके यांनी प्रस्ताविक केले. प्रसन्न ओझरकर यांनी सूत्रसंचालन केले.
