[Zee 24 Taas]"कितीही मस्ती असली तरी..."
नितीन गडकरींचे नाव घेत सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्याला सुनावले
निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे : राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या नेहमीच त्यांच्या कार्यशैलीमुळे चर्चेत असतात. लोकसभेतही (Lok Sabha) त्या आक्रमकपणे प्रश्न मांडत असतात. त्यांच्या मतदारासंघातील प्रश्न सुप्रिया सुळे मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांसमोर मांडत असतात. अशाच एका प्रश्नावरुन सुप्रिया सुळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे. तसेच अधिकाऱ्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले.
पुण्याच्या भोरमधील शिवरे गावच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंग रोडला ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. मात्र अधिकाऱ्यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. या बैठकीदरम्यान सुप्रिया सुळे रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापलेल्या पहायला मिळाल्या.
या चर्चेदरम्यान अधिकाऱ्याने ग्रामस्थांच्या विरोधात भूमिका घेत रस्ता करणारं असल्याचे म्हटल्याने सुप्रिया सुळे भडकल्या. त्यांनी अधिकाऱ्याला थेट तुमची तक्रार नितीन गडकरी यांच्याकडे करणार असल्याचे म्हटले. अधिकाऱ्याला कितीही मस्ती असली, तरी ग्रामस्थ म्हणत नाहीत तोपर्यंत मी रस्ता होऊ देणारं नाही अशी भूमिका सुळेंनी घेतली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
"तुम्ही डिपार्टंमेंटमध्ये काम करता का? तुमचं नाव आणि पत्ता सांगा नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये सांगायला लागेल. या अधिकाऱ्याच्या समोर सांगतेय याला कितीही मस्ती असली ना की रस्ता करेन तरी मी तुम्हाला शब्द देतेय तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही. बस्स झालं. तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही," असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. यासोबत मी जमिनीच्या अधिग्रहणाची परवानगी दिली नाही तर रस्त्याचे काम थांबून राहील, असाही इशारा यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिला.