1 minute reading time (294 words)

[Sarkarnama]पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

पुणे-कोकण पर्यटनाच्या विकासासाठी सुळेंचं गडकरींना साकडं

केली ही मागणी

बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळदपासून कर्णवडीमार्गे महाडला जोडणारा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करावा. तसेच या रस्त्याचं काम लवकर करण्यात यावं, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. हा रस्ता झाल्यास येथील दळणवळण वाढेल. पर्यटनास गती मिळेल, त्यातून या भागातील स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लेखी पत्र पाठवले आहे. त्यात महाड-रानवडी-कर्णवडी-मढेघाट-केळद-पासली-भट्टी-वेल्हे-आंबवणे-नसरापूर-चेलाडी फाटा राज्यमार्ग १०६ हा मार्ग आहे.हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ४८ - पुणे बंगळूर हायवे व राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई-गोवा हायवे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडला जातो. हा पुण्याहून कोकणला (Pune to Kokan) जाणारा जवळचा मार्ग आहे. तो मार्ग राष्ट्रीय महामार्ग असा घोषित करावा. तसेच त्याचे काम पूर्णत्वास जाणे अत्यावश्यक आहे, असं सुळे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

पत्रात पुढे सुळे यांनी नमूद केलं आहे, वेल्हे हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तालुका आहे. या परिसरात इतिहासाची साक्ष देणाऱ्या बनेश्वर, किल्ले राजगड (Rajgad), तोरणा तसेच मढेघाट आदी वास्तू, किल्ले आणि देवस्थानांची रेलचेल आहे. त्यामुळे गडकोटांना आणि ऐतिहासिक वारसा स्थळांना भेट देणाऱ्या गडप्रेमी आणि अभ्यासक तसेच पर्यटकांची संख्याही लक्षणीय आहे.

याबरोबरच वेल्हे तालुका (Velhe) हा दुर्गम डोंगराळ भाग असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध नाहीत. हे लक्षात घेता या भागातून जाणारा महामार्ग विकसित केल्यास या परिसरातील दळणवळण वाढेल. यामुळे वेल्हे तालुक्याशी आजूबाजूच्या परिसराचा संपर्क वाढेल. त्यामुळे या परिसरातील पर्यटनासही चालना मिळेल. यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, याकडेही सुळे यांनी लक्ष वेधले आहे.

[Pudhari]पानशेत खोरे राजमार्गाने रायगडला जोडणार-खा...