1 minute reading time (197 words)

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा

सुप्रिया सुळेंनी फेसबुक लाईव्हवरून मांडली रस्त्यांची व्यथा
बारामती शहर - राज्यातील दोन प्रमुख समजल्या जाणाऱ्या जेजुरी व मोरगाव या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज फेसबुक लाईव्ह करत थेट मुख्यमंत्र्यांनाच आवाहन करीत तातडीने दुरुस्तीची मागणी केली. केवळ हाच नाही तर राज्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अशी मागणी त्यांनी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने भाविकांनी मागणी करुनही या रस्त्यांची दुरुस्ती होत नाही, काल दोन अपघात झाले दोघेही लोक रुग्णालयात दाखल झालेले आहेत. सरकारला कधी जाग येणार व कधी रस्ता नीट होणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही लोकांसाठी मी सरकारदरबारी या निमित्ताने न्याय मागते, असेही सुळे यांनी सांगितले.

जेजुरीनजिक रेल्वे उड्डाणपूलावरुन सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाईव्ह करत खड्डयांची परिस्थिती किती भीषण आहे याचे चित्रणच लोकांना दाखविले. या फेसबुक लाईव्ह दरम्यान लोकांशी संवाद साधत त्यांनी लोकांच्या भावना चित्रीत केल्या, मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत हे खड्डे त्वरित बुजविण्याबाबत तसेच रस्ता व्यवस्थित करण्याबाबत विनंती केली. नियोजनशून्य कारभाराचे वाभाडे काढत सुप्रिया सुळे यांनी प्रशासकीय हलगर्जीपणाचा लोकांना किती त्रास होतो हे यातून दाखवून दिले.

दुष्काळाबाबतही उपाययोजना हव्यात...पुरंदर तालुक्याला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे, नाझरे धरणातील पाणी साठा वेगाने संपत आहे, अशा स्थितीत लोकांना दिलासा देणारे निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावेत, असेही आवाहन त्यांनी केले.


https://www.esakal.com/pune/supriya-sule-shows-bad-conditions-streets-through-facebook-live-154932
[News 18 Lokmat]निवडणूक सर्व्हेची आकडेवारी भाजपचं ...
महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरला नाही : सुप्रिया सु...