बारामती - कोणत्या गोष्टीचा संबंध नेमका कशाशी असेल याची पुसटशीही कल्पना अनेकदा आपल्याला नसते, मात्र या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत केले तर अनेक प्रश्न चुटकीसरशी दूर होतात ही बाब खासदार सुप्रिया सुळे यांच्या श्रवणयंत्र वाटप कार्यक्रमातून गेल्या चार वर्षात सिध्द झाली आहे.
ज्येष्ठ नागरिक वयोमानापरत्वे कानाने नीट ऐकू शकत नाहीत. ऐकूच येत नाही म्हटल की कुटुंब आणि समाजही अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करु लागतात, त्या व्यक्तीचा इतरांशी संवाद खुंटल्याप्रमाणे होतो आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मन व शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. अनेकदा या छोट्याशा गोष्टीमुळे कौटुंबिक कलह वाढतात आणि त्याचा परिणाम मने दुभंगण्यावरही दिसतो. या ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र दिले तर या सर्वच समस्या दूर होतील आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील, ही बाब विचारात घेऊन ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने सुप्रिया सुळे यांनी अमेरिकास्थित स्टार्की फाऊंडेशनचे बिल अँस्टिन व टॅनी अँस्टिन या दांपत्यांला श्रवणयंत्र देण्याची विनंती केली. सामाजिक भान असलेल्या या दांपत्यांने गेल्या चार वर्षात प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीची जवळपास 15 हजार श्रवणयंत्रे बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक व बालकांना विनामूल्य देऊ केली आहेत.
दरवर्षी हे दांपत्य अमेरिकेतून स्वखर्चाने संपूर्ण टीमसह भारतात येऊन नागरिकांना हे यंत्र बसविण्याचे काम करीत आहे. त्यांच्याकडून दिले जाणारे श्रवणयंत्र अमेरिकन बनावटीचे असून त्याचा मोल्ड हा डेन्मार्कचा आहे. अत्यंत उत्तम दर्जाची अशी ही श्रवणयंत्रे व पूरक साहित्य आहे.
प्रतिवर्षी पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व दुस-या टप्प्यात बालके अशा नावनोंदणी होणा-या प्रत्येकाला विनामूल्य दोन्ही कानांची श्रवणयंत्रे व पूरक साहित्यही दिले जाते. स्टार्की फाऊंडेशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विद्या प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने व मुंबईस्थित एसआरव्ही ट्रस्ट व ठाकरसी समूह आणि पुणे जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या मदतीने हा उपक्रम गेली चार वर्षे सातत्याने राबविला जात आहे.
या उपक्रमाचे वैशिष्टय म्हणजे आजवर श्रवणयंत्र बसविलेल्या प्रत्येक रुग्णाची नियमित तपासणी केली जाते, केवळ यंत्र बसवून हा कार्यक्रम संपत नाही तर नियमित तपासणी केल्यामुळे काही जणांच्या अडचणी असतील तर त्याही सोडविल्या जातात. ग्रामीण भागात श्रवणयंत्र लावून समाजात वावरण्याची अनेकांना लाज वाटत असे, आता मात्र ऐकायला छान येत आहे हे लक्षात आल्याने लोक उत्स्फूर्तपणे नावनोंदणी करतात, त्याचा फायदाही त्यांना होतो.
ऐकायला कमी आल्याने मनात एकटेपणाची भावना निर्माण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र बसविल्यानंतर जेव्हा पहिला आवाज ऐकू येतो, तेव्हा त्यांच्या चेह-यावर जो आनंद असतो, तो खरच शब्दातीत असतो अशी भावना या उपक्रमात स्वयंसेवक म्हणून कार्यरत अनेकांनी बोलून दाखविली. निरपेक्षपणे आजी आजोबांच्या सेवेसाठी अनेक स्वयंसेवक या उपक्रमात सहभागी होतात.
कोणीही वंचित राहू नये....ऐकता येत नाही म्हणून एकही ज्येष्ठ नागरिक किंवा बालक समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला पडू नये हीच सुप्रिया सुळे यांची प्रामाणिक इच्छा आहे. आजी आजोबांमुळे कुटुंबात आनंद फुलावा आणि त्यांच्या जीवनाची संध्याकाळही हसतखेळत व्यतित व्हावी हाच या उपक्रमामागे त्यांचा हेतू आहे.
श्रवणयंत्रासाठी तपासणीच्या आगामी तारखा पुढील प्रमाणे आहेत - सिंहगड रोड, पुणे- 16 ऑगस्ट, मुळशी उपजिल्हा रुग्णालय- 17 ऑगस्ट, भोर उपजिल्हा रुग्णालय- 18, पुरंदर-संभाजी सभागृह, सासवड, 19, बारामती- राष्ट्रवादी भवन, कसबा, -20, इंदापूर- 21 ऑगस्ट. या बाबत अधिक माहितीसाठी 020-24264253 किंवा 24263266 व दीपाली पवार बारामती 9960728400 या क्रमांकावर संपर्क साधावा.
http://www.esakal.com/pune/hearing-aid-distribution-program-baramati-137112