मिलिंद संगई : मंगळवार, 4 सप्टेंबर 2018
Dr. Ragini Parekh Gave New Life To Many - Sharad Pawar
बारामती शहर - डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी आजपर्यंत मोतीबिंदूच्या अडीच लाखांवर शस्त्रक्रीया करुन अनेकांना नवदृष्टी दिली आहे. समाज कायमच त्यांच्या ऋणात राहिल, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज आपल्या भावना व्यक्त केल्या. एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती, पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने आयोजित मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया शिबीराच्या समारोप प्रसंगी पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, फोरमच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
गेले तीन दिवस सुरु असलेल्या शिबीरात 426 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आला. शरद पवार यांनी लहाने व पारेख गावोगाव जाऊन रुग्णांवर मोफत शस्त्रक्रीया करण्याचे काम करतात त्याची प्रशंसा केली. बारामतीतही ते नियमितपणे येऊन फोरमच्या माध्यमातून ज्येष्ठांना नवदृष्टी देतात या बाबत पवार यांनी समाधान व्यक्त केले.
प्रास्ताविकात सुनेत्रा पवार यांनी या शिबीराचा आढावा घेतला, या शिबीरासह मागील सर्व शिबीरांसाठी लहाने व पारेख डॉक्टरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरवर्षी अधिकाधिक रुग्णांवर शस्त्रक्रीयेचा फोरमचा प्रयत्न असतो, पुढील शिबीरांपासून रुग्णांची संख्या वाढविण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखविला.
डॉ. तात्याराव लहाने यांनी शरद पवार यांच्यासमवेतच्या ऋणानुबंधांची माहिती देत त्यांनी सुरवातीपासूनच या कामात मोलाची मदत केल्याचे नमूद केले. या प्रसंगी या शिबीरासाठी सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
दृष्टीदानाची चळवळ व्यापक व्हावी...दरम्यान डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख यांनी सुरु केलेली ही दृष्टीदानाची चळवळ अधिक व्यापक व्हावी, बारामती प्रमाणेच इंदापूर व इतर तालुक्यांनाही त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी भाषणात व्यक्त केली, त्याला डॉ. तात्याराव लहाने यांनी दुजोरा देत अशी शिबीरे करण्यास तयार असल्याचे सांगितले.
http://www.esakal.com/pune/dr-ragini-parekh-gave-new-life-many-sharad-pawar-141646