बारामती- केंद्र सरकारच्या माध्यमातून गावोगावी पासपोर्ट मिळवून देण्यासाठी हाती घेण्यात आलेला महत्वाकांक्षी प्रकल्प निश्चितपणे उपयुक्त आहे. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठे काम करीत असल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
बारामतीच्या पोस्ट कार्यालयात सुरु करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन आज पवार यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्टमास्टर जनरल एस. एफ. एच. रिझवी, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी आपला पासपोर्ट कसा काढला याच्या आठवणींना उजाळा देतानाच पासपोर्टची प्रक्रीया कालानुरुप कशी बदलत गेली या बाबत माहिती दिली. ज्ञानेश्वर मुळे यांच्यासारखा एक मराठी माणूस देशाच्या परराष्ट्र विभागाच्या सचिवपदाच्या माध्यमातून महत्वाचे काम करीत असल्याचा वेगळा आनंद त्यांनी बोलून दाखविला.
प्रत्येक व्यक्तीला त्वरेने पासपोर्ट द्यावा असा शासनाचा प्रयत्न असून ही एक चळवळ देशात उभी केल्याचे मुळे यांनी सांगितले. आज पासपोर्ट ही चैनीची बाब राहिली नसून गरज बनली आहे, त्या मुळे प्रत्येकाकडे पासपोर्ट हवा हा आमचा प्रयत्न आहे. सुषमा स्वराज यांच्या सूचनेनंतर आज देशभरात 219 पासपोर्ट कार्यालये सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले.
सुप्रिया सुळे यांनीही बारामतीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्यासाठी मुळे यांनी पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांचे आभार व्यक्त केले. यामुळे बारामतीकरांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रशासकीय भवनात कार्यालय हवे...बारामतीच्या प्रशासकीय इमारतीत पासपोर्ट कार्यालय स्थलांतरीत करावे अशी सूचना शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी ज्ञानेश्वर मुळे यांना केली. भविष्यातील गर्दी विचारात घेऊन हा बदल करावा असे ते म्हणाले.
http://www.esakal.com/pune/dnyaneshwar-mulay-praise-sharad-pawar-141689