1 minute reading time
(288 words)
तलवारबाजी करणाऱ्या सुप्रियाताई पाहिल्यात का? (व्हिडिओ)
पुणे : सकाळी कॉलेजमध्ये मुली नुकत्याच आलेल्या, आपापल्या वर्गात जाऊन तासिकांसाठी तयारी करत असतानाच शिक्षकांकडून निरोप येतो… खासदार सुप्रिया सुळे आल्या आहेत; आणि त्यांची टीम स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत. ऐकताच मुली हॉलमध्ये धाव घेतात…. आणि… प्रत्यक्ष सुप्रियाताईच हातात तलवार घेऊन एका काळे डगलेवाल्याशी दोन हात करत असतात. क्षणार्धात सगळ्या मुलींमध्येही वेगळाच हुरूप येतो आणि टाळ्यांच्या गजरात ताईंचे स्वागत करत प्रशिक्षण सुरू होते.
शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या मुलींपासून कामानिमित्त घरातून बाहेर जाणाऱ्या महिलांपर्यंत हजारोजणींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढण्यासही मदत होते, ही गरज ओळखून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि ऑल महाराष्ट्र थांग-ता असोशिएशन यांच्या संयुक्त माध्यमातून आज महिला आणि मुलींना तलवरबाजीचे प्रशिक्षण देण्यात आले.
हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेच्या साधना विद्यालयात झालेल्या या शिबिरात स्वतः सुप्रिया सुळे यांनी हातात तलवार घेऊन पट्टीच्या तलवारबाजाप्रमाणे केलेली प्रात्यक्षिके महिलांसाठी प्रेरणादायी ठरली. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, प्रा. अरविंद बुरुंगले, अजित अभंगकर, सुरेखा ठाकरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मुलगी बाहेर गेली तर आता कुठल्याही आईला तिच्या संरक्षणाची काळजी वाटणार नाही. स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी ती सक्षम असेल. यामुळेच बारामती मतदारसंघातील महाविद्यालयांत मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. माझ्या मतदार संघातील कोणतीही मुलगी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, महिलांनी स्वतःच स्वतःचे संरक्षण करायला शिकले पाहिजे. त्यासाठी वेवगवेगळी तंत्रे आत्मसात केली पाहिजेत. त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर कोणत्याही संकटाचा सामना त्या करू शकतील. यातून महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रकार कमी होतील.
थांग-ता असोसीएशनचे सचिव महावीर धुळधर आणि उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून सुरू झालेले हे प्रशिक्षण येत्या ६ डिसेंबर पर्यंत बारामती लोकसभा मतदार संघातील निवडक महाविद्यालयांत सुरू राहणार आहे. प्रत्येकी दोन दिवसांच्या या शिबिरात एकूण ३५ प्रशिकधकांची टीम त्या त्या महाविद्यालयांतील विद्यार्थिनींना तलवारबाजी आणि स्वसंरक्षणाचे धडे देणार आहेत.