5 minutes reading time (1067 words)

आमच्याही लेकी घेतील गगनभरारी

आमच्याही लेकी घेतील गगनभरारी

देशाच्या राजकारण आणि समाजकारणात पवार कुटुंबीय गेल्या अर्ध्या शतकाहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. याचा पाया माझ्या वडीलांच्या आई, माझ्या आजी शारदाबाई पवार आणि माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या आहेत. शारदाबाई पवार यांनी अतिशय हिंमतीने कठोर प्रसंगांना सामोरे जात कुटुंबाचे संगोपन केले. सामाजीक जीवनातही त्यांनी मोठ्या हिंमतीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांना सत्यशोधक समाजाच्या विचारांचा वारसा होता. त्यांची जडणघडणच सेवासदनमध्ये झाली होती. ही वैचारीक जडणघडणच त्यांना आगामी आयुष्यभर पुरली. त्याचप्रमाणे माझ्या आईच्या आई निर्मला शिंदे या देखील अतिशय कर्तृत्त्ववान होत्या.

मुलं लहान असताना त्यांना ऐन तारुण्यात वयाच्या २८ व्या वर्षी अकाली वैधव्य आलं. या आघाताने खचून न जाता त्यांनी मुला-मुलींचे संगोपन केले व त्यांना उत्तम शिक्षण दिले. त्यांनी आपल्या आयुष्यात सगळे निर्णय स्वतंत्रपणे घेतले. दोन्हीकडील कुटुंबांच्या प्रमुख या माझ्या आज्याच होत्या. माझ्या सर्व बहिणींना आमच्या घरात स्वातंत्र्य मिळाले व समानतेची वागणूक मिळाली, तसेच आमच्या घरात लग्न होऊन आलेल्या माझ्या सर्व वहिन्यांनाही घरात समानतेची वागणूक मिळाली. माझ्या या दोन्ही आज्यांची जीवनकहाणी माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. माझी आईसुद्धा याच वातावरणात वाढल्यामुळे त्याचप्रमाणे जगणारी आहे. बाबा सामाजिक-राजकीय जीवनामध्ये पूर्णपणे व्यस्त असल्यामुळे, माझ्या आयुष्यातील सर्व निर्णय मी माझ्या आईच्या मार्गदर्शनाने व मदतीने घेतले आहेत.

माझ्या जन्मानंतर म्हणजे साधारणतः ४८ वर्षांपुर्वी माझ्या आई-वडीलांनी दुसरे अपत्य नको असा निर्णय घेतला. यासाठी माझ्या वडीलांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करुन घेतली. याचा भार त्यांनी माझ्या आईवर टाकला नाही. ही त्याकाळी मोठी क्रांतीकारक गोष्ट होती. आजही जेंव्हा मी याचा विचार करते तेंव्हा मी आश्चर्यचकीत होते. पुढे माझी मुलगी रेवती हिच्यानंतर कुटुंबीयांच्या आग्रहाखातर आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार केला तेंव्हा बाबा मला म्हणाले, ‘एक मुलगी असताना तुम्ही दुसऱ्या मुलाचा विचार का करताय ?’ स्त्री-पुरुष समानतेचा विचार इतक्या सहजपणे अंगीकारणाऱ्या अशा कुटुंबात मी लहानाची मोठी झाले. घरात कधीही मुलगी म्हणून वेगळी वागणूक मला मिळाली नाही.

इतर भावांप्रमाणेच मला वागवलं गेलं. त्यात मी स्वतः मुंबईसारख्या ‘कॉस्मोपॉलिटन’ शहरात लहानाची मोठी झाले. लग्नानंतर काही काळ आम्ही उभयता परदेशात राहिलो. तेथेही मला स्त्री-पुरुष विषमतेची झळ बसली नव्हती. या सर्व पार्श्वभूमीवर मी जेंव्हा भारतात परत येऊन सार्वजनिक आयुष्याला सुरुवात केली. त्यावेळी समाजात वावरत असताना स्त्री-पुरुष असमानतेची झळ मला जाणवू लागली. स्त्री-पुरुष जननदरातील मोठी तफावत, मला खूप चिंताजनक बाब वाटत होती. त्याचवेळी २०११ च्या जनगणनेचा अहवाल माझ्या हाती आला आणि त्याने माझ्या शंकेवर शिक्कामोर्तब केले. दर हजारी ९४० पर्यंत मुलींचा जननदर घसरला होता.

प्रगत समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांत मुलींचा जननदर तर फारच घसरला होता. त्यात लाजिरवाणी बाब अशी होती कि अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्त्री-भ्रुण हत्येचे प्रकार घडत होते. बीड जिल्ह्यातील परळी येथील एका दवाखान्यात एका अशाच दुर्दैवी प्रकरणात मातेचा मृत्यू झाला व त्या प्रकरणात वडिलांना अटक होऊन ४ मुली व वयोवृद्ध आजी हे कुटुंब उघड्यावर आले. मी त्यांच्या बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील भोपा गावातील घरी जाऊन त्यांची भेट घेतली, विचारपूस केली व त्यातील ३ मोठ्या मुलींना बारामतीमधील शारदानगर विद्यालयात पुढील शिक्षणासाठी पाठविले. त्या मुली अतिशय प्रसन्न आणि तजेलदार चेहऱ्याने आज जेंव्हा मला भेटतात तेंव्हा खूप आनंद होतो. यापुढील काळात अशा अनेक मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेत गेलो.

त्यानंतर आम्ही "जागर" हा उपक्रम हाती घेतला आणि त्याचे प्रतिक म्हणून “जागर जाणीवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा” असे घोषवाक्य आमच्या सर्वांच्या डोक्यात सतत घुमू लागले. महाराष्ट्रातील मुली, महिला आणि कार्यकर्त्यांना घेऊन २०११ साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथील जन्मस्थळापासून ते पुण्यातील गंज पेठेतील महात्मा फुले वाड्यापर्यंत भव्य पदयात्रा काढली. त्या मोहिमेअंतर्गत जेंव्हा मुली माझ्याशी संवाद साधू लागल्या तेंव्हा माझ्या कल्पनेपलीकडील विश्व माझ्यापुढे उभे राहत गेले. मुली बोलत होत्या, मी ऐकत होते..

त्यांच्या अनुभवांचे विश्व माझ्यासाठी अनोळखी होतेच शिवाय तितकेच धक्कादायकही...या अनुभवांनी माझे भावनाविश्व पुर्णतः बदलून गेले. मी महिलांच्या प्रश्नांविषयी अधिकच संवेदनशील होऊ लागले. त्याविषयी सातत्याने विचार करु लागले. यातूनच मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांना उपस्थित राहत असे तेंव्हा मला तेथे तरुणींचे प्रतिनिधीत्त्व नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यामुळेच त्यांना प्रतिनिधीत्त्व देता येईल का, मुख्य प्रवाहात कसे आणता येईल याचा विचार केला. या विचाराची परिणती म्हणजे २०१२ साली राष्ट्रवादी युवती काँग्रेस उभारण्याचा पक्षाने निर्णय घेतला. हा देशातील अशाप्रकारचा पहिलावहिला प्रयोग होता.

ज्यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांनी केलेल्या भाषणातील शब्द अजूनही माझ्या लक्षात आहेत. साहेब म्हणाले होते की, “यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजकीय लाभ होईल का नाही हे मला माहित नाही, पण महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने एक पाऊल जरी पडलं तरी या उपक्रमाचे सार्थक झाले असे होईल”. साहेबांचा हाच दृष्टीकोन मी सातत्याने ठेवला आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे राज्यभर किमान पन्नास मेळावे झाले. या मेळाव्यांत मुलींशी संवाद साधता आला. त्यातून त्यांचे प्रश्न समजत गेले.

यामध्ये महाविद्यालयांमध्ये होणारी तरुणींची छेडछाड, हुंडा यांसारखे प्रश्न गंभीर असल्याचे पुढे आले. यामुळे आम्ही महाविद्यालये छेडछाडमुक्त व्हावीत यासाठी पुढाकार घेतला. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे प्रशिक्षणासारखे उपक्रम सुरु केले. हुंडाप्रथेचा प्रश्न बिकट आहे. याला सामाजीक, आर्थिक पदर आहेत. यातून आम्ही सामुदायिक विवाहसोहळ्याचा पर्याय पुढे आणला. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. एका राजकीय पक्षाची मी कार्यकर्ती आहे. आमच्या पक्षासाठी मी काम करतच असते, ते करताना महिलांविषयक विधायक आणि आधुनिक दृष्टीकोन कसा ठेवता येईल याची प्रेरणा मला माझ्या पक्ष नेतृत्वाकडूनच मिळते.

त्यानंतरच्या काळात महाराष्ट्राने भीषण दुष्काळ पाहिला. त्यावेळी जनतेशी संवाद साधत असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा मला भेटत होत्या. त्यांची स्थिती अतिशय बिकट होती. त्यांना ना सासरी थारा होता ना माहेरी. मी स्वतः दरवर्षी अशा किमान २०० महिलांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं. या सर्व महिला ३० ते ४० वयोगटांतील आहेत. त्यांचं दुःख आभाळाएवढं आहे. ते संपूर्णपणे कमी करता नाही आलं तरी त्यातील काही भाग आपण वाटून घेऊ शकतो. या भूमिकेतून मी त्यांच्याशी संवाद साधते. त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी व्यवसाय सुरु करून दिले आहेत. याशिवाय त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी आपण घेतली आहे.

त्यांच्या व मुलांच्या आरोग्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या आहेत. गेल्या वर्षी देशाच्या आर्थिक क्षेत्रात जीएसटीसारख्या वेगळ्या कररचनेने जन्म घेतला. या कराच्या माध्यमातून देशभरात एकसमान कर रचना अस्तित्त्वात येणार असून अनेक जीवनावश्यक वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील असे गोड-गुलाबी स्वप्न विद्यमान सत्ताधाऱ्यांनी दाखविले होते. परंतु प्रत्यक्षात जेंव्हा या कराची अंमलबजावणी सुरु झाली तेंव्हा अत्यंत घाईने घेतलेल्या या निर्णयातील एक एक त्रुटी पुढे येऊ लागल्या.

त्यातील सर्वात अक्षम्य अशी चुक म्हणजे सॅनिटरी पॅडवर लावण्यात आलेला बारा टक्के जीएसटी.... एकीकडे देशातील जवळपास अर्ध्या लोकसंख्येची मुलभूत गरज असणारी सॅनिटरी पॅडसारखी वस्तू अद्यापही ८० टक्के महिलांपर्यंत पोहोचत नाही; परिणामी अस्वच्छता आणि इतर कारणांमुळे त्या आजारी पडतात अशी स्थिती, तर दुसरीकडे आवाक्याबाहेर गेलेले दर. या सर्वांचा विचार करुन आम्ही सॅनिटरी पॅडवरील जीएसटी दूर करण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे.

याशिवाय आम्ही वेळोवेळी सॅनिटरी पॅड तळागाळातील प्रत्येक लेकीपर्यंत कसे पोहोचतील याचीही काळजी घेत आहोत. त्याबाबत जनजागृती करीत असून आगामी काळात सॅनिटरी पॅडवरील जीएसटी हटविण्यास आपण सर्वजणी सरकारला भाग पाडू असा मला विश्वास आहे. राष्ट्रीय कन्या दिनाच्या निमित्ताने हा स्त्री-पुरुष समानतेचा जागर पुढील काळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. स्री-पुरुष समानता आणि त्यांच्या न्याय्य हक्कांचे युग लवकर अवतरण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलू शकतो. अर्थात मार्ग खडतर आणि पल्ला लांबचा आहे पण आपले प्रयत्नही अविश्रांत सुरु आहेत. आपण नक्कीच यशस्वी होऊ, असा सार्थ विश्वास मला वाटतो.

- सुप्रिया सुळे, खासदार

आपणच होऊ त्यांचे व्हॅलेंटाईन
Born Free