1 minute reading time (281 words)

वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला

वंदे भारत एक्स्प्रेसला अखेर दौंड येथे थांबा मिळाला

खा. सुप्रिया सुळे यांचा यशस्वी पाठपुरावा; रेल्वेमंत्र्यांचे मानले आभार

पुणे : मुंबईहून ते सोलापूर धावणाऱ्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'ला दौंड येथे अखेर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी सुरू झाली त्या पहिल्या दिवसापासून म्हणजे १० फेब्रुवारी २०२३ पासून खासदार सुप्रिया सुळे या दौंड स्थानकावर या गाडीला थांबा द्यावा यासाठी पाठपुरावा करत होत्या. अखेर त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.

रेल्वे विभागाने नोटिफिकेशन काढत या गाडीला दौंड स्थानकावर थांबा दिल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, सर्व संबंधीत संस्था, संघटनासोबतच या गाडीला थांबा मिळावा यासाठी सुळे यांच्या मागणीला सकारात्मक पाठिंबा देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि सर्व स्थानिक पत्रकारांचेही आभार मानले आहेत.

हे आभार मानतानाच त्यांनी रेल्वे मंत्रालयाला कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या दौंड, बोरिबेल भिगवणसह काही महत्वाच्या स्थानकांवरील अन्य गाड्यांच्या थांब्याचीही आठवण करून दिली आहे. कोविड कालावधीत दौंड, आणि भिगवण आदि स्थानकावरून मार्गस्थ होणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे तसेच पुणे - सोलापूर पॅसेंजर गाडीचा बोरीबेल येथील थांबा रद्द करण्यात आले आहेत. चार वर्षे उलटून गेली तरी थांबे अद्यापही सुरू करण्यात आले नाहीत. त्या सर्व गाड्यांचे थांबे पुरर्वत सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.

दौंड हे रेल्वेच्या सोलापूर मार्गावरील अतिशय महत्त्वाचे जंक्शन आहे. इतकेच नाही, तर दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारे सर्वात मोठे रेल्वेस्थानक दौंड येथे आहे. हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सोयीसाठी वंदे भारत या गाडीला या स्थानकावर थांबा देण्याची आत्यंतिक गरज आहे, ही बाब स्थानिक नागरिकांच्या मागणीचा दाखला देत खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आणून देत होत्या. त्याला अखेर यश आले असून सुळे यांनी या घटनेला 'आनंद वार्ता' असे म्हणत समस्त दौंड वासीयांना ही घटना सोशल मीडियावरील त्यांच्या अकौंटवरून कळवली आहे. 

वय हा केवळ एक आकडा