"...और कारवाँ बनता गया"
शरद पवार यांचा साठच्या दशकातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
"...और कारवाँ बनता गया!"
अशी कॅप्शन देत खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार शरद पवार यांचा १९५६ सालातला एक फोटो पोस्ट केला आहे. शरद पवार यांनी २२ फेब्रुवारी १९६७ रोजी पहिल्यांदा विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यांच्या या संसदीय कारकीर्दीला यावर्षी ५६ वर्षे पुर्ण झाली. त्यानिमित्ताने त्यांनी हा फोटो पोस्ट केला असून त्यांची तीच ऊर्जा, तोच जोश आजही कायम असल्याचे जणू या फोटोतून त्यांना सुचवायचे आहे.
तब्बल साठहून अधिक वर्षांपूर्वी शरद पवार त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालतानाचा हा फोटो आहे. त्या सर्वांच्या चेहऱ्यावरचे हास्य नजरेत भरण्यासारखे आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वर हा फोटो पोस्ट करत खासदार सुळे यांनी
'हा वसा सहा दशकांहून अधिक जनसेवेचा,
हा प्रवास विश्वास, आपुलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा!'
अशा नेमक्या ओळीत पवार यांच्या देदिप्यमान वाटचालीचे वर्णन केले आहे.
पवार यांनी आंदोलन करत असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनास्थळी अचानक काल रात्री भेट दिली. त्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी रात्री उशिरा आंदोलनकर्त्या तरुणांना भेटत त्यांच्या समस्या जाणून घेणे, आधार देणे ही पवार यांची अखंड ऊर्जा आजही कायम असून ते त्याच उत्साहाने जनतेच्या समस्या जाणून घेत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणाऱ्या नेत्याचे 'लोकसेवा' हेच टॉनिक असून सतत लोकांमध्ये राहून त्यांचे समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, हेच जणू खासदार सुळे यांना सांगायचे आहे.
.....और कारवां बनता गया I
— Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2023
हा वसा सहा दशकांहून अधिक जनसेवेचा,
हा प्रवास विश्वास, आपुलकी आणि कर्तव्यनिष्ठेचा !
56 years ago, still going strong 👏👍 pic.twitter.com/I4feAaeWRX