1 minute reading time (260 words)

परदेशात शिकत असलेल्या अडचणीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरा : खा. सुप्रिया सुळे

परदेशात शिकत असलेल्या अडचणीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरा : खा. सुप्रिया सुळे
पुणे : ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत येथे शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील काही विद्यार्थ्यांना एटिकेटी लागल्याने त्यांना मिळत असलेली 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' बंद झाली आहे. अशा स्थितीत त्यांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्याने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. त्यांना शुल्क भरण्यासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी याबाबत ट्विटर द्वारे मागणी केली आहे. 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' अंतर्गत परदेशात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची पूर्ण शिक्षण फी, वैद्यकीय विमा व व्हिसा शुल्क मिळते. यात त्या विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. चुकून त्यांना एटीकेटी लागू झाली तर त्यांची शिष्यवृत्ती रोखली जाते. अशा प्रसंगी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असे सुळे यांनी म्हटले आहे.

सध्या ऑस्ट्रेलिया येथे शिक्षण घेत असलेल्या नभश्री जांभूळकर, खुशबू जगताप, सायली शेंडगे, दिपक उरमोडे, प्रथमेश यादव, श्वेता सावरकर, स्वप्निल लिंगायत, साची बारहाते, श्रद्धा भोले तर अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या शाश्वत भगत यांच्यावर अशी स्थिती ओढावली आहे. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क वेळीच भरले गेले नाही तर त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. तरी या एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा. तसेच या योजनेतील त्रुटी दुर करून त्यांना ६ महिन्यांच्या शैक्षणिक भत्त्यासहित निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यां...
कलागुणांना वाव देणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे