1 minute reading time (242 words)

ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यांना तरी न्याय द्या

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल

एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येवरून खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारला संतप्त सवाल

पुणे : वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एसटी चालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून ज्यांच्या आंदोलनाचे भांडवल करून सत्तेत बसलात त्यांना तरी न्याय द्या, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.

भीमराव सूर्यवंशी असे आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. ते कवठेमहांकाळ येथे वास्तव्यास होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. फेब्रुवारी महिना अर्धा संपत आला, तरी अद्याप जानेवारी महिन्याचा सुद्धा पगार झालेला नाही, अशा बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्यातच वेळेवर पगार नाही, घरखर्च कसा भागवायचा या विवंचनेतून सुर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खासदार सुळे या चांगल्याच संतापल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर याबाबत टीका करत त्यांनी या दोघांना उद्देशून ट्विट केले आहे.

'एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेले ईडी सरकार' अशी राज्य सरकारची संभावना करत सुळे यांनी याच एसटी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा वेळेवर करण्यात देखील अपयशी ठरले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला, हे अतिशय संतापजनक आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे. 
ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांची पुण्यात उद्...
परदेशात शिकत असलेल्या अडचणीतील विद्यार्थ्यांचे शैक...