2 minutes reading time
(343 words)
देऊळगाव रसाळ येथील शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा
पाटबंधारे विभागाचे अधिकारी आज घेणार उपोषणकर्त्यांची भेट; सर्वोतापरी मदत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील देऊळगाव रसाळ व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसंदर्भातील विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (दि. २३) देऊळगाव रसाळ ग्रामपंचायतीसमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी ग्रामस्थ आणि पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
खासदार सुळे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली. त्यानुसार पाटबंधारे विभागाचे अधिकारी देऊळगाव रसाळ येथे भेट देऊन ग्रामस्थ व उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करून त्यांच्या मागण्यांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
*जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेची सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळपर्यंत संपूर्ण बंदिस्त पाईपलाईन करावी.
*बंदिस्त पाईपलाईनचा संपूर्ण गावाचा नकाशा ग्रामस्थांना देण्यात यावा.
*देऊळगाव रसाळ येथील उर्वरित सर्व तलाव व बंधाऱ्यांचा जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेत समावेश करावा.
*जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, ती पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा.
*सुपे वितरण कुंड ते देऊळगाव रसाळपर्यंत पाण्याच्या गळतीमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने बेकायदेशीर सायफनिंगवर कायदेशीर कारवाई करावी.
*बंदिस्त पाईपलाईनमुळे वाचणारे पाणी या भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांतील तलावांना शेतीसाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावे.
*जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना पूर्णपणे सौर ऊर्जेवर कार्यान्वित करावी.
*बंदिस्त पाईपलाईनचे काम पूर्ण होईपर्यंत कालव्याची गळती थांबवून यंत्राद्वारे कालव्याची साफसफाई करावी.
*गावातील अपूर्ण राहिलेल्या पोटचाऱ्यांची कामे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पूर्ण करावीत.
*रसाळवाडी येथील तलावाला 'रसाळवाडी महादेव मंदिर तलाव' असे नाव देण्यात यावे.
नऊ शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
या मागण्यांसाठी नागेश शंकर रसाळ, आनंद ज्ञानदेव रसाळ, तानाजी महादेव रसाळ, अमोल बाबूराव वाबळे, राजेंद्र श्रीरंग रसाळ, अनिल काशीनाथ वाबळे, रामदास काशीनाथ थोरात, अश्पाक याकुभभाई इनामदार आणि पांडुरंग मोहन रसाळ हे नऊ शेतकरी बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत.
शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या शेतीच्या पाण्याशी आणि त्यांच्या उपजीविकेशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक तोडगा काढावा. तसेच उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या या सर्व मागण्या शेतीच्या पाण्याशी आणि त्यांच्या उपजीविकेशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक तोडगा काढावा. तसेच उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
