1 minute reading time
(197 words)
नीट परिक्षार्थींच्या अंतरवस्त्रांपर्यंत तपासणीवरून खासदार सुळे यांचा संताप
संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी 'नीट' ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची अंतर्वस्त्रे देखील तपासण्यात आली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर कपडे बदलावी लागल्याची तक्रार पालक तथा परीक्षार्थींनी केली आहे. या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या चांगल्याच संतापल्या असून अशी अपमानास्पद झडती घेणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ट्विटद्वारे केली आहे.
सांगली येथे हा प्रकार घडला असून परीक्षा द्यायला आलेल्या मुलींसोबत देखील घडलयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हा प्रकार संतापजनक आणि अतिशय गंभीर बाब असून हा विनयभंगाचा प्रकार आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना टॅग करत त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.ही परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या नियमावलीत अशा प्रकारे झडती घेण्याची तरतूद करण्यात आली आहे का? विद्यार्थ्यांच्या अशा प्रकारच्या झडती घेऊन त्यांचे मानसिक खच्चीकरण का केले जात आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारे अपमानास्पद झडती घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी 'नीट' ही परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची अंतर्वस्त्रे देखील तपासण्यात आली असून विद्यार्थ्यांना उघड्यावर कपडे बदलावी लागल्याची तक्रार पालक तथा परीक्षार्थींनी केली आहे. हा प्रकार मुलींसोबत देखील घडला हे संतापजनक आहे. ही अतिशय गंभीर बाब असून… pic.twitter.com/UflIy5doZJ
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2023